महाराष्ट्र

सातारा वन विभागाच्या फिरत्या पथकासाठी स्वतंत्र कार्यालय.

सातारा वन विभागाच्या फिरत्या पथकासाठी स्वतंत्र कार्यालय इमारतीचे लोकार्पण वनसंरक्षण व अतिक्रमण निर्मूलनाला मिळणार अधिक बळ

सातारा वन विभागांतर्गत वनांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे राबवणे, वन जमिनीवरील अतिक्रमण तसेच अवैध शिकार रोखण्याच्या उद्देशाने (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) फिरत्या पथकासाठी स्वतंत्र कार्यालय इमारत सज्ज करण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पण आज शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते यांच्या हस्ते संपन्न झाले.

सातारा जिल्हा हा वनसंपदेने समृद्ध असून पश्चिम घाटातील संवेदनशील वनक्षेत्राचे संरक्षण करणे हे वन विभागासमोर मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अवैध शिकार, लाकूड तस्करी, वनौषधींची चोरी, वणवे रोखणे तसेच वन जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्यासाठी वन विभागाचे ‘फिरते पथक’ अहोरात्र कार्यरत असते.

या पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी तसेच गोपनीय आणि प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र व्हावे, यासाठी स्वतंत्र व सर्व सोयीसुविधांनी युक्त कार्यालयाची आवश्यकता होती. सातारा वनरोपवाटीकेतील नादुरुस्त इमारतीचे नूतनीकरण करून हे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. याठिकाणी खबरी, नागरिक, चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आरोपी तसेच अधिकारी व कर्मचारी यांची सतत वर्दळ असते. त्यामुळे पूर्वी गोपनीय कामकाजात अडचणी येत होत्या, त्या आता दूर होणार आहेत.

नवीन कार्यालयामुळे फिरत्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना २४ तास कर्तव्यावर असताना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध झाल्या असून, यामुळे वनसंरक्षण व संवर्धनाचे काम अधिक प्रभावीपणे करता येईल, असा विश्वास उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास सहा. वनसंरक्षक (वनीकरण) श्री. प्रदीप रौंधळ, वनक्षेत्रपाल श्री. संदीप जोपळे, वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) श्री. गणेश महांगडे, फिरत्या पथकातील कर्मचारी तसेच विभागीय कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

📢 जाहीर आवाहन
वन विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाकूडतोड, दुर्मिळ वनौषधींची चोरी किंवा वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित वन विभागाच्या फिरत्या पथकास किंवा टोल फ्री क्रमांक 1926 वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गुप्त ठेवले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button