कुडाळ परिसरात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू
शेताच्या बांधावर जाऊन पाहणी: शेतकऱ्यांना मदतीची आशा

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार
जावळी तालुक्यातील कुडाळ व परिसरात पावसाच्या अभावामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.नीलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ गावचे ग्रामविकास अधिकारी उमेश जाधव यांनी शेताच्या बांधावर जाऊन पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी केली जात आहे.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र कांबळे,स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने कुडाळसह आसपासच्या गावांतील सोयाबीन आणि विविध कडधान्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली,अनेक ठिकाणी पिके वाळून गेली,तर काही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. ऐन काढणीच्या तोंडावर पिकांची झालेली दयनीय अवस्था पाहून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
पंचनाम्यादरम्यान कुडाळचे ग्रामविकास अधिकारी उमेश जाधव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली.केवळ कार्यालयीन नोंदींवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची स्थिती समजून घेण्यावर भर दिला जात आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी ग्रामविकास अधिकारी उमेश जाधव म्हणाले, दुष्काळाच्या शेतीच्या पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे.” असे आवाहन पंचायत समिती कार्यालय व तहसील कार्यालय जावली यांच्यावतीने करण्यात आले आहे.तसेच आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर ग्रामपंचायत कार्यालय कुडाळ येथे आणून जमा करावीत असे आवाहन ग्रामविकास अधिकारी उमेश जाधव यांनी केले आहे.
नुकसानभरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष शेतीसाठी केलेला खर्च,बियाणे, खते,औषधे आणि मशागतीवरील गुंतवणूक यांचा विचार करता पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.पावसाच्या अनिश्चिततेमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता पंचनाम्याच्या माध्यमातून शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे.दरम्यान,पंचनामे करताना नुकसानग्रस्त क्षेत्राची योग्य नोंद, पिकांची प्रत्यक्ष स्थिती आणि संबंधित शेतकऱ्यांची माहिती अचूकपणे नोंदविणे महत्त्वाचे ठरणार आहे.पंचनाम्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या लागू निकषांनुसार नुकसानभरपाईचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.



