Uncategorized

गणेशोत्सव गेला,आता नवरात्री-दसऱ्यापूर्वी तरी कुडाळचा रस्ता पूर्ण करा!

नवरात्रोत्सव,देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता

प्रतिनिधी कुडाळ:प्रसन्न पवार

कुडाळ येथील इंदिरानगर ते मुख्य बाजारपेठ या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करून देण्यात येईल,असे आश्वासन ठेकेदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र,गणेशोत्सव संपूनही रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.आता नवरात्रोत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला असून, आतातरी रस्त्याचे काम पूर्ण करावे,अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
कुडाळ मुख्य बाजारपेठेतून सर्जापूर व पाचवडच्या दिशेने जाणाऱ्या कॉर्नर परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी टाकण्यात आली आहे.या खडीवरून दुचाकी तसेच चारचाकी वाहने घसरत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून,विशेषतः दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे.

दरम्यान उद्यापासून घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे.नवरात्रोत्सवाच्या काळात श्री.पिंपळेश्वर व श्री.वाकडेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी कुडाळसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने ये-जा करतात.या काळात मंदिरांकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी होत असते.त्यातच रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्यास महिला,ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह येणाऱ्या भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

नवरात्रोत्सवानंतर विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो.कुडाळ गावचा शाही दसरा पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भक्तगण येत असतात.अशा वेळी कुडाळ मुख्य बाजारपेठेतील रस्ता अपूर्ण अवस्थेत राहिल्यास वाहतूक कोंडीसह नागरिकांची मोठी गैरसोय होऊ शकते.

रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी तातडीने व्यवस्थित करून रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करावे,तसेच नवरात्रोत्सव व दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तसेच गणेशोत्सवापूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही.आता नवरात्रोत्सव आणि दसरा तोंडावर आला आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणखी वेळकाढूपणा न करता तातडीने काम पूर्ण करावे,अन्यथा नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

कुडाळ येथील श्री.पिंपळेश्वर श्री.वाकडेश्वर महाराजांचे उपवास कडक असल्याने या काळात चप्पल न घालण्याची प्रथा असून गावातील अंतर्गत रस्ता उकरून त्यावर टाकलेल्या खडीतून चप्पल न घालता दररोज भाविकांना मंदिरामध्ये जाताना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागणार आहे.
रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी नागरिक आक्रमक झाले असून,सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. उत्सवाच्या काळात हजारो भाविक या मार्गावरून दररोज प्रवास करणार असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

अमोल शिंदे

संचालक,कुडाळ विकास सेवा सोसायटी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button