Uncategorized

धोमच्या उजव्या कालव्याला पाणी सुटणार कधी?:शेतकऱ्यांचा सवाल

दुष्काळाच्या झळा तीव्र;शेतकरी नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार

जावळी तालुक्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप हंगामातील पिकांसह पशुधनाला पाणीटंचाईचा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.अशा परिस्थितीत धोम धरणाच्या उजव्या कालव्याला यंदा पाणी कधी सुटणार,पाण्याची किती आवर्तने मिळणार आणि प्रत्येक आवर्तन किती दिवस सुरू राहणार,असे अनेक प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. याबाबत धोम कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

धोमच्या उजव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाणी नियोजनाची प्रतीक्षा लागली आहे.खरीप पिकांना पाण्याची गरज असताना पहिले आवर्तन नेमके कधी सोडले जाणार,याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.पाणी सोडण्यास विलंब झाल्यास पिकांच्या वाढीवर,उत्पादनावर आणि फिरस्ते आलेले मेंढपाळ यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतीचे गणित बिघडले आहे.काही भागांत पिकांना आवश्यक ओलावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.अशा वेळी कालव्याला पाणी सोडण्याचे वेळापत्रक,एकूण आवर्तनांची संख्या,प्रत्येक आवर्तनाचा कालावधी आणि पाणीवाटपाचे नियोजन याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कालव्याला पाणी सोडण्याबाबत ठोस नियोजन जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना पिकांचे व्यवस्थापन, पाण्याचा वापर आणि पुढील शेतीकामांचे नियोजन करता येईल. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष पाणी उपलब्धतेबाबत स्पष्ट भूमिका मांडावी,अशी मागणी शेतकरी करत आहेत.

दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे.दुष्काळाच्या सावटाखाली शेती वाचविण्यासाठी पाण्याचे नियोजन वेळेत होणे आवश्यक आहे.आता धोमच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत प्रशासन कधी निर्णय घेणार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्थानिक नेते कधी पुढाकार घेणार याकडे जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जावलीतील शेतकऱ्यांचे नेते कुठे गायब?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळख सांगणारे स्थानिक नेते या महत्त्वाच्या पाणीप्रश्नावर कितपत सक्रिय आहेत,असा सवालही जावळी तालुक्यातील शेतकरी वर्गासह स्थानिक नागरिक उपस्थित करू लागले आहेत.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करणे,पाणी नियोजनाची माहिती मिळविणे आणि आवश्यक आवर्तनांसाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना या विषयावर ठोस हालचाली दिसत नसल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे.शेतकऱ्यांच्या अडचणींच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, प्रशासनाकडे प्रश्न मांडणे आणि त्यावर उत्तर मिळवून देणे ही स्थानिक नेतृत्वाची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे धोमच्या उजव्या कालव्याच्या पाणीप्रश्नावर जावलीतील स्थानिक लोकप्रतिनिधी,विविध शेतकरी संघटना आणि संबंधित नेते कोणती भूमिका घेतात,याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button