कल्याण–शीळफाटा वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्याचा निषेध

प्रतिनिधी : संदीप भोसले कल्याण
कल्याण–शीळफाटा मार्गावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, या कोंडीचा सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, कामगार, चालक तसेच रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा वाहनचालकांना एक ते दोन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित वाहतूक पोलिसांनी प्रभावी नियोजन करून महत्त्वाच्या चौकांमध्ये पुरेशा प्रमाणात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्याने केली आहे.
वाहतूक कोंडीच्या काळात अधिक सक्रियपणे वाहतूक नियंत्रण होणे गरजेचे आहे. वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कल्याण–शीळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योग्य वाहतूक नियोजन, अतिक्रमणावर कारवाई, सिग्नल व्यवस्थेचे योग्य नियोजन तसेच गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सर्वसामान्य नागरिकांना दररोज होणारा त्रास कमी करून कल्याण–शीळफाटा मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे.



