साताऱ्यात बनावट खत-कीटकनाशक रॅकेट उघडकीस;संयुक्त कारवाईत ३० लाखांची बनावट खते-कीडनाशके जप्त
वडूज परिसरातील बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाची धाड; शेतकऱ्यांची फसवणूक करणारे संघटित रॅकेट उध्वस्त

सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या संयुक्त कारवाईत सुमारे ३० लाख रुपये किमतीची बनावट रासायनिक खते व कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत.जिल्हाधिकारी सातारा, पोलीस अधीक्षक सातारा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.०० वाजता ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जिल्हास्तरीय भरारी पथक आणि सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने वडूज, तालुका खटाव येथे छापा टाकला.या कारवाईत जिल्हा परिषद साताराचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. संजय फडतरे, कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) के. के. राऊत यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रोहित फारणे व इतर पोलीस अधिकारी सहभागी होते.
छाप्यात वडूज येथील प्रतीक काळे यांच्या राहत्या घरासमोरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या दाखवलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणावर बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा साठा आढळून आला. यामध्ये अनुदानित रासायनिक खतांपैकी पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड कंपनीचे डीएपी (१८:४६) खताच्या ९० भरलेल्या गोण्या तसेच डीएपी खत म्हणून वापरण्याच्या उद्देशाने साठवलेला सुमारे ३९० गोण्यांचा नाव नसलेला कच्चा माल आढळून आला. याशिवाय म्युरेट ऑफ पोटॅश या रासायनिक खताच्या १५ गोण्या जप्त करण्यात आल्या.
तसेच नॅशनल अॅग्रो हायटेक कंपनीच्या नावाने सुमारे १ मेट्रिक टन बोरिक अॅसिड, क्लोरोपायरीफॉस १० टक्के दाणेदार कीटकनाशक सुमारे २.७ मेट्रिक टन, ग्लायफोसेट ४१% एसएल या तणनाशकाच्या १ लिटर क्षमतेच्या सुमारे ३८० बाटल्या तसेच २०० लिटरच्या बॅरलमध्ये साठवलेले संशयित ग्लायफोसेट आढळून आले. हे द्रव्य १ लिटरच्या बाटल्यांमध्ये भरून विक्रीसाठी वापरण्याचा उद्देश असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय उंदीरनाशक झिंक फॉस्फेट सुमारे १२ किलो (१० ग्रॅमच्या पॅकेटमध्ये) तसेच संशयित कीटकनाशक अॅल्युमिनियम फॉस्फाईड सुमारे २० किलो (१० ग्रॅम पॅकेटमध्ये) जप्त करण्यात आले. त्याचबरोबर पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड व जय किसान कंपनीच्या १८:४६ व १०:२६:२६ या खतांच्या सुमारे १,५८० नव्याने छापील रिकाम्या गोण्या, इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीच्या म्युरेट ऑफ पोटॅश खताच्या सुमारे २५० रिकाम्या गोण्या तसेच इफको को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या १८:४६ खताच्या सुमारे २०० नव्या छपाईच्या रिकाम्या गोण्या आढळून आल्या.
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २५.५० लाख रुपये इतकी असून तपासादरम्यान सुमारे १,९८० वापरलेल्या गोण्या आढळून आल्याने यापूर्वी अंदाजे ३० लाख रुपयांचे बनावट खत विकले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मोजे टाकळवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, टाकळवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथे बोगस रासायनिक खत प्रकरणी दाखल तक्रारीच्या अनुषंगाने व मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून सुरू आहे.
वडूजमध्ये बनावट खतांचा आणि कीडनाशकांचा पर्दाफाश! दोन-तीन कंपन्यांच्या नावाने बनावट डीएपी खतांचा मोठा साठा सापडला.शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान. यापूर्वीही याच भेसळखोरांचा सहभाग असून कृषी विभागाच्या कानाडोळ्यामुळे हा धंदा फोफावला. भेसळखोरांच्या मुसक्या आवळा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन छेडणार अशी ठाम मागणी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी केली आहे.



