जावळी-मेढा तलाठी कार्यालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर; वेळेत अधिकारी न आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

मेढा (प्रतिनिधी): श्रीकांत गोळे
जावळी तालुक्यातील मेढा येथील तलाठी कार्यालयाचा अनास्था आणि गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शासकीय वेळापत्रकाला हरतास फासून उशिरा उघडणाऱ्या आणि वेळेवर अधिकारी-कर्मचारी उपस्थित न राहणाऱ्या या कार्यालयामुळे दाखल्यांसाठी ताटकळत बसलेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे मोठे हाल झाले आहेत. याप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजले तरी मेढा येथील तलाठी कार्यालय कुलूपबंद अवस्थेत होते. कार्यालय उघडल्यानंतरही आतील एकाही खुर्चीवर अधिकृत अधिकारी किंवा कर्मचारी हजर नव्हता.
सध्या शैक्षणिक प्रवेश आणि विविध योजनांसाठी उत्पन्न दाखला, जातीचा दाखला यांसारख्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी विद्यार्थी व त्यांचे पालक सकाळपासूनच कार्यालयाबाहेर रांगेत उभे होते. मात्र, अधिकारी उशिरा पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत राहावे लागले. कार्यालयात उपस्थित एका कर्मचाऱ्याला विचारणा केली असता, “सर्वजण ११ वाजता येतात,” अशी थातूरमातूर उत्तरे देण्यात आली; परंतु प्रत्यक्षात साडेअकरा वाजेपर्यंतही कोणीही कार्यालयात उपस्थित नव्हते.

नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा संताप:
शासकीय कार्यालयांची ठरवून दिलेली वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५:४५ अशी असताना मेढा तलाठी कार्यालय मनमानी पद्धतीने उघडत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन प्रवेशाच्या हंगामात वेळेत दाखले न मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशाला मुकावे लागण्याची शक्यता असून, यामुळे होत असलेल्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल विद्यार्थी व पालकांनी उपस्थित केला आहे.
प्रमुख मागण्या:
१. मेढा तलाठी कार्यालय वेळेत न उघडणाऱ्या आणि गैरहजर राहणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून तहसीलदार साहेबांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
२. कार्यालय वेळेत सुरू राहून नागरिकांना व विद्यार्थ्यांना विनाअडथळा आणि वेळेत सेवा मिळण्याची खात्री द्यावी.
याप्रकरणी तहसीलदार महोदयांनी तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.



