सुट्टीवर आलेल्या भारतीय जवानावर काळाचा घाला; लेकीचे मुख पाहण्याआधीच अपघाती निधन ..
सुट्टीवर आलेल्या भारतीय जवानावर काळाचा घाला; लेकीचे मुख पाहण्याआधीच अपघाती निधन ..

सातारा तालुक्यातील परळी विभागातील दरे (पोस्ट आरे) येथील रहिवासी तथा भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव यांचा साताऱ्यातील भिक्षेकरी गृह परिसरात दुर्दैवी अपघातात अकाली मृत्यू झाला. देशसेवेचे व्रत घेतलेला हा वीर जवान पत्नीच्या प्रसूतीसाठी अवघ्या आठ दिवसांपूर्वीच सुट्टीवर गावी आला होता. पत्नीची डिलिव्हरी होणार असल्याने आनंदात असलेला हा परिवार एका क्षणात शोकसागरात बुडाला.
अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे जवान प्रमोद जाधव यांच्या निधनानंतर काही तासांतच त्यांच्या पत्नीने कन्यारत्नास जन्म दिला. मात्र नियतीच्या कठोर निर्णयामुळे लेकीचे मुख पाहण्याआधीच या वीर जवानावर काळाने घाला घातला. पित्याच्या छत्रछायेशिवाय जन्माला आलेल्या त्या चिमुकलीसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, नवजात कन्या व वडील असा परिवार आहे.
देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा देणारा हा जवान सुट्टीवर असतानाच अशा प्रकारे अपघातात गमावला जाणे, ही घटना अत्यंत वेदनादायक असून संपूर्ण सातारा जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे. एका बाजूला लेकीच्या आगमनाचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला पित्याच्या जाण्याचे असह्य दुःख अशी ही काळजाला चटका लावणारी घटना सर्वांच्या मनात खोलवर घर करून गेली आहे.
जयहिंद फाऊंडेशनकडून हुतात्मा वीरजवान प्रमोद जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. देशासाठी सेवा करत असलेल्या या वीर जवानाच्या बलिदानास आम्ही नमन करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व दुःखग्रस्त कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. 🙏
जयहिंद! 🇮🇳
#JaihindFoundation #श्रद्धांजली #IndianArmy #VeerJawan #Satara Parali Dare RIP SaluteToSoldier JaiHind



