Uncategorizedमहाराष्ट्र

रहिमतपूर पोलीस आणि बाल कल्याण समितीची तत्परता; १५ वर्षांच्या अल्पवयीन बालिकेला मिळवून दिले कायदेशीर संरक्षण!

लग्नाची सनई वाजण्यापूर्वीच पोलिसांचा सायरन घुमला! रहिमतपूर हद्दीतील बालविवाह रोखला

एका अल्पवयीन बालिकेचे बालपण अंधारात ढकलणारा एक बेकायदेशीर बालविवाह रहीमतपूर पोलीस आणि बाल संरक्षण यंत्रणेनेच्या सतर्कतेमुळे वेळेत रोखण्यात आला आहे. रहीमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाबाहेरील मंदिरात हा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि वेगाने कारवाई करत या बालिकेची सुरक्षित सुटका केली असून तिला कायद्याचे संरक्षण मिळवून दिले आहे.

दिनांक २६ जून रोजी रहीमतपूर पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची खात्रीशीर माहिती प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांना मिळाली. माहिती मिळताच वेगाने हालचाली करत रहीमतपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ संबंधित गावाबाहेरील नियोजित विवाह स्थळी (मंदिरात) विवाहाचे विधी सुरू होणार तोच सदर ठिकाणी धाड टाकली. त्याठिकाणी विवाहाची तयारी सुरू असून २५ ते ३० नातेवाईक उपस्थित होते. पोलिसांनी तिथे जात विवाह थांबवला आणि नवरी मुलीच्या वयाच्या अधिकृत कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली की, मुलीचे वय लग्नासाठी कायदेशीररित्या आवश्यक असलेल्या १८ वर्षांपेक्षा कमी (१५ वर्षे ३ महिने) असल्याचे निष्पन्न झाले.

मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट होताच रहीमतपूर पोलिसांनी संवेदनशील पाऊल उचलत तात्काळ कोरेगाव येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी, (CDPO) शारदा जाधव तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने बालिकेला सुरक्षितपणे आणि विश्वासात घेऊन तिच्या नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी (कोरेगाव) यांनी तयार केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे, सदर बालिकेला तात्काळ सातारा जिल्हा बाल कल्याण समिती, (Child Welfare Committee CWC) समोर हजर करण्यात आले. बाल कल्याण समितीने बालिकेचे सर्वोत्तम हित, मानसिक स्थिती आणि सुरक्षा लक्षात घेऊन तिला काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालिका म्हणून घोषित केल्याने समितीच्या अंतिम आदेशानुसार बालिकेला सुरक्षित वातावरणात ठेवून तिची पुढील शिक्षण, पुनर्वसन व समुपदेशन प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये १८ वर्षांखालील मुलीचा विवाह करणे, विवाहाचा प्रयत्न करणे विवाह ठरवणे, त्यात कोणत्याही प्रकारे मदत करणे किंवा त्यास प्रोत्साहन देणे हा कायद्याने अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर (भटजी/वाजंत्री, मंडपवाले आणि नातेवाईक) कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. मुलींचे बालपण वाचवणे आणि त्यांना सक्षम बनवणे ही केवळ शासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. नागरिकांना आपल्या परिसरात असा कोणताही बेकायदेशीर बालविवाह होत असल्याचे किंवा ठरत असल्याचे आढळल्यास किंवा महिती मिळुन आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला किंवा १०९८ (चाईल्डलाईन) या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात बाल विवाह मुक्त भारत अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवले जात आहे. या मोहिमेला बळ देत रहीमतपूर पोलीस आणि स्थानिक बाल संरक्षण यंत्रणेने एका अत्यंत कौतुकास्पद व संवेदनशील कारवाईद्वारे एका अल्पवयीन बालिकेचा विवाह वेळेत रोखला आहे. त्याबाबत ग्रामस्थांकडुन त्यांचे कौतुक होत आहे.

सदरची कामगिरी ही रहिमतपूर पोलीस स्टेशनची प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोलीस हवालदार प्रवीण बर्गे, शंकर घाडगे, महेश शेडगे, सुशांत शिंदे, महिला पोलीस हवालदार शितल सानप, पोलीस कॉन्स्टेबल समाधान देशमुख, संजय सपकाळ, तुषार काळंगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी घाडगे शुभांगी पाटोळे, अर्पिता गायकवाड यांच्यासह बाल विकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव यांनी केली आहे. सदर कामगिरी बाबत मा. पोलीस अधीक्षक सो, निखिल पिंगळे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो, डॉक्टर वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगांव, श्रीमती राजश्री तेरणी यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

 

या बातमीला कोणत्या प्रकारची फोटो लावू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button