झाशी येथे कर्तव्य बजावताना साताऱ्याच्या सुपुत्राला वीरमरण; जवान रोहित पवार यांच्यावर चिंचणीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

रंगतारा प्रतिनिधी :- श्रीकांत गोळे.
सातारा: सातारा तालुक्यातील चिंचणी येथील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्यातील नाईक रोहित रामचंद्र पवार (वय ३६) यांचे उत्तर प्रदेशातील झाशी येथे ऑनड्युटी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. २ oceanic ९ मध्ये सैन्यात भरती झालेले रोहित पवार ११४ आर्माड इंजिनियर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांत ते सेवानिवृत्त होणार होते; मात्र त्यापूर्वीच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. शुक्रवारी (दि. ११) शोकाकुल वातावरणात त्यांच्या जन्मगावी चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
देशसेवेची उज्ज्वल परंपरा असलेला परिवार
कै. रोहित पवार यांच्या कुटुंबाला देशसेवेचा मोठा वारसा लाभला आहे. त्यांचे वडील आणि दोन बंधू सैन्यातून सेवानिवृत्त झाले असून, मधले बंधू सध्या पोलीस दलात कार्यरत आहेत. संपूर्ण कुटुंब देशसेवेत असतानाच रोहित यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
१२ किलोमीटरची भव्य जनसागर रॅली
शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास रोहित पवार यांचे पार्थिव साताऱ्यातील मोळाचा ओढा येथे पोहोचले. तेथून चिंचणीपर्यंत सुमारे १२ किलोमीटरच्या मार्गावर गावकऱ्यांनी भव्य मोटरसायकल रॅली काढून वीरजवानाला भावपूर्ण निरोप दिला. दुपारी २ वाजता पार्थिव चिंचणी गावात दाखल झाले. रॅलीच्या संपूर्ण मार्गात विविध गावांतील नागरिकांनी दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.
अश्रूंचा बांध फुटला, बंदुकीच्या फैरी झाडून सलामी
रोहित यांचे पार्थिव निवासास्थानी आणताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. कोल्हापूरहून आलेल्या सैन्य दलाच्या तुकडीने आणि प्रशासनाने बंदुकीच्या फैरी झाडून अमर जवान रोहित पवार यांना अंतिम सलामी दिली. दुपारी ३:३० वाजता वेण्णा कण्हेर जलाशयातील स्मशानभूमीत त्यांच्या दोन लहान मुली व पुतण्याच्या हस्ते पार्थिवाला अग्नि देण्यात आला. याप्रसंगी ‘वरदायनी माता तरुण मंडळ’च्या कार्यकर्त्यांसह, ग्रामस्थ, महिला व बालकांना अश्रू अनावर झाले होते.
प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांकडून श्रद्धांजली अंत्यसंस्कारापूर्वी खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, जिल्हा सैनिक कल्याण मंडळ, उपविभागीय अधिकारी आशिष बारकूल, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सभापती महेश गाडे, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव सावंत, अजित साळुंखे, तहसीलदार समीर यादव आणि निवासी नायब तहसीलदार प्रशांत कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून वीरजवानाला आदरांजली वाहिली.
कण्हेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका या वेळी तैनात होती. रोहित पवार यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, भावजय, दोन लहान मुली, पुतणे व विस्तारित परिवार आहे.



