Uncategorized

विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणवत्तेला मिळणार नवी दिशा;‘प्रकल्प शक्ती’ अंतर्गत रिमांड होममध्ये फिटनेस चाचणी.

“विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणवत्ता योग्य वेळी हेरून त्यांना शास्त्रीय प्रशिक्षण देणार; आधुनिक फिटनेस चाचणीमुळे गुणवत्तावान खेळाडूंचा शोध घेण्यास मदत” — नगराध्यक्ष अमोल मोहिते.

सातारा प्रतिनिधी: विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या शाळांमध्ये ‘स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रोग्राम अँड टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत साताऱ्यातील रिमांड होममध्ये ‘प्रकल्प शक्ती’ अंतर्गत विद्यार्थ्यांची आधुनिक पद्धतीने फिटनेस चाचणी घेण्यात आली.
या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांची उंची, वजन, स्टँडिंग ब्रॉड जंप, काऊंटर मूव्हमेंट जंप, ३० मीटर धावणे, ४×१० मीटर शटल तसेच हँडग्रिप आदी विविध बाबींची तपासणी करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेची अचूक नोंद घेण्यात आली.

या उपक्रमाचा उद्देश शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे आरोग्य व क्रीडा यांना प्रोत्साहन देणे, प्रत्येक विद्यार्थ्याची फिटनेस क्षमता समजून घेणे तसेच क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना नियोजनबद्ध प्रशिक्षणाची दिशा देणे, हा आहे. चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षमतेचा वस्तुनिष्ठ डेटा उपलब्ध होणार असून, त्याआधारे भविष्यातील क्रीडा विकासाचे नियोजन करता येणार आहे.

यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, शिक्षण सभापती शंकर किर्दत, महिला व बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे, नियोजन सभापती अशोक शेडगे,स्थायी समिती सदस्य सुजाता राजेमहाडिक, नगरसेवक शंकर माळवदे, नगरसेविका अनिता फरांदे व रिना भणगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आधुनिक तंत्रज्ञानातून क्रीडा गुणवत्तेचा शोध
प्रत्येक विद्यार्थ्याची फिटनेस क्षमता शास्त्रीय पद्धतीने तपासून त्याची बलस्थाने आणि सुधारणा आवश्यक असलेल्या बाबींची माहिती मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात योग्य क्रीडा प्रकारासाठी विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button