बेकायदेशीर डीजे मिरवणूक काढल्याप्रकरणी मोरे कॉलनीतील चौघांवर सातारा तालुका पोलिसांत गुन्हा दाखल.

सातारा: परवानगी न घेता डीजे साऊंडच्या तालावर गणेशमूर्तीची आगमन मिरवणूक काढणे तसेच पोलीस नोटीसचे उल्लंघन करणे मोरे कॉलनी (दरे खुर्द) येथील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध शासकीय नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९:०० ते १०:३० वाजेच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय शामराव कुंभार (वय ४३) व पोलीस हवालदार चव्हाण हे गस्त घालत असताना, ‘शिवनगर गणेशोत्सव मंडळ’, मोरे कॉलनी येथे विनापरवानगी डीजे साऊंडसह आगमन मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मिरवणूक वाद्यांच्या गजरात सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
या मिरवणुकीबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी ६ सप्टेंबर २०२६ रोजी जावक क्रमांक ५५/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. १६८ नुसार पूर्वसूचना (नोटीस) बजावली होती. मात्र, या नोटीसचे उल्लंघन करून कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता ही मिरवणूक काढण्यात आल्याचे समोर आले.
याप्रकरणी पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत रवींद्र पवार, प्रथमेश मुरलीधर कीर्दत, गणेश रवींद्र पवार आणि राहुल रामचंद्र भोसले (सर्व रा. मोरे कॉलनी, दरे खुर्द, जि. सातारा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, ३(५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (r) नुसार सरकारतर्फे गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सातारा तालुका पोलीस करत आहेत.



