रक्षक प्रतिष्ठानचे नवीन कार्यालय आता सदर बझारमध्ये; लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मोझर यांची नवी पाऊलवाट.
"सदर बझार हे माझे घर"; लोकांच्या सोयीसाठी सुशील दादा मोझर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन.गुटखा, गांजा आणि अंमली पदार्थांच्या विरोधात सुशील दादा मोझर यांचा एल्गार; मुख्यमंत्र्यांनाही पाठवणार मेल.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांनी केले उद्घाटन
सातारा : सातारा शहरातील सदर बझार परिसरातील नागरिकांसाठी रक्षक प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांच्या हस्ते धुमधडाक्यात करण्यात आले.
यावेळी जितेंद्र खानविलकर, वैभव पोतदार व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांची कार्यक्रमस्थळी एन्ट्री होताच फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. यानंतर सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. यानंतर मोझर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना मोझर म्हणाले, मी सदर बझारचा आहे. इथल्या नागरिकांच्या अडीअडचणीसाठी प्रत्येक वेळी मी धावून येत असतो. मात्र काही वेळेस माझ्याशी संपर्क होत नसल्याने येथील नागरिकांना काही अडचण, प्रश्न निर्माण झाल्यास त्यांनी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा व त्यांचे प्रश्न, अडचणी येथे लेखी स्वरुपात द्यावेत. त्यांच्या प्रश्नासंदर्भात येथील कार्यकर्ते त्यांना मदत करतील व काम करण्यामध्ये कागदपत्रांच्या त्रुटीमुळे काही अडचण निर्माण झाल्यास त्यांना स्वतः संपर्कही साधतील. त्या अनुषंगाने नागरिकांचे प्रश्न जनसंपर्क कार्यालयाद्वारे सोडवले जातील.
सातारा शहरातील सुरू असलेल्या नशाखोरी बाबत त्यांना विचारले असता मोझर म्हणाले, येत्या काही दिवसातच मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असून त्याद्वारे हा प्रश्न तडीस नेणार आहे. सातारा शहरासह जिल्ह्यातील युवकांचे जीवनमान या नशाखोरीमुळे उद्ध्वस्त होत आहे. त्याची मला सर्वात जास्त चीड आहे.
यावेळी सदर बझार मधील अनेक नागरिकांनी आपले प्रश्न लेखी स्वरूपात मोझर यांना दिले. उद्घाटन कार्यक्रमास सदर बझार परिसरातील अबालवृद्ध नागरिक, माता-भगिनी, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



