महाराष्ट्र

निवडणूक आयोगाकडून ‘पिपाणी’ चिन्ह कायमस्वरूपी रद्दबाबत; उशिरा आलेले शहाणपण-शशिकांत शिंदे.

शरद पवारांच्या 'तुतारी' चिन्हाचे संकट टळले.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले. यामध्ये अजित पवार यांच्या गटाला ‘घड्याळ’ हे मूळ चिन्ह मिळाले, तर शरद पवार यांच्या गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आले. मात्र, अपक्ष उमेदवारांना मिळणाऱ्या ‘पिपाणी’ या साधर्म्य असणाऱ्या चिन्हामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दोन निवडणुकांमध्ये मोठा दणका बसला. याच पार्श्वभूमीवर, आता निवडणूक आयोगाने अपक्षांसाठी असलेले हे ‘पिपाणी’ चिन्ह कायमस्वरूपी रद्दबातल केले आहे.

निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आनंद व्यक्त करतानाच निवडणूक आयोगाला खोचक टोला लगावला. शिंदे यांनी ट्विट करत, तुतारी चिन्हाशी साधर्म्य असलेले पिपाणी चिन्ह कायमचे वगळल्याबद्दल आयोगाचे आभार मानले आहेत. पण त्याच वेळी, झालेल्या नुकसानीचा संदर्भ देत त्यांनी निवडणूक आयोगाला खडे बोल सुद्धा सुनावले आहेत.

शशिकांत शिंदे ट्विट करत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या चिन्हामुळे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मोठा गोंधळ निर्माण झाला, त्याची राजकीय किंमत पक्षाला चुकवावी लागली होती. हा निर्णय जर आधीच घेतला गेला असता, तर आज महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय चित्र नक्कीच वेगळे असते. शेवटी, उशिरा सुचलेले शहाणपण असे याला म्हणावे लागेल. निवडणूक चिन्हातून
पिपाणी (ट्रम्पेट)’ हे चिन्ह कायमचे वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार! हा निर्णय लोकशाही आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी एक सकारात्मक पाऊल आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह आणि अपक्ष उमेदवारांना दिलेले ‘पिपाणी’ हे चिन्ह यांच्यातील साधर्म्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या चिन्हांमधील साधर्म्यामुळे लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली आणि थेट निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम दिसून आला. सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना याच पिपाणी चिन्हामुळे पराभवाला सामोरे जावे लागले, तर बीड लोकसभेतही असाच प्रकार घडला होता.

सातारा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात जोरदार शड्डू ठोकला होता. मात्र, पिपाणीमुळे मतविभागणी झाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, या संपूर्ण गोंधळावर उदयनराजे भोसले यांनी सुद्धा जाहीरपणे भाष्य केले होते. या गंभीर नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, आता निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह कायमस्वरूपी रद्दबातल करण्याचा निर्णय घेतल्याने, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button