Uncategorized

कोयना धरणाच्या ‘शिवाजी सागर’ जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय.

शिवाजी जलसागर असं नाव असलेल्या कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव आता छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर या नावाने ओळखलं जाणार आहे.

पश्चिम महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि वरदान ठरलेल्या कोयना धरणाच्या जलाशयाचे (Koyna Dam) नाव आता अधिकृतपणे ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.

कोयना जलसागराला यापूर्वी ‘शिवाजी सागर’ या नावाने ओळखले जात होते. मात्र, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख अयोग्य असल्याने, या जलाशयाला महाराजांचे पूर्ण आणि आदरयुक्त नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवप्रेमी नागरिक आणि विविध संघटनांकडून सातत्याने केली जात होती.

जलसंपदा मंत्र्यांचा पुढाकार अन् मुख्यमंत्र्यांची मंजुरी
या लोकभावनेची दखल घेत जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत विशेष पुढाकार घेतला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोयना जलाशयाचे औपचारिक नामांतर करण्याची विनंती केली होती. जलसंपदा विभागाच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत महायुती सरकारने तत्काळ शासन निर्णय जारी केला.

शिवप्रेमी नागरिकांमधून आनंद व्यक्त
पूर्वीच्या ‘शिवाजी सागर’ या नावाऐवजी आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नाव निश्चित झाल्यामुळे शिवप्रेमी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जलसागराचे नामांतर करण्याच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे विशेष आभार मानले आहेत.

महाराजांच्या पूर्ण सन्मानासह नवे नाव.

कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जलप्रकल्पांपैकी एक असून, या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा योग्य तो आदर आणि सन्मान राखला गेला असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. शासकीय कागदपत्रे आणि दैनंदिन व्यवहारात आता याच नव्या नावाचा अधिकृत वापर केला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button