नामदेव मर्ढेकर रिटकवली रिटकवलीच्या महाकाली माता गोविंदा पथकाने साताऱ्यात दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला.
जावळीच्या शिरपेचात मानाचा तुरा; साताऱ्याच्या राजधानीत रिटकवलीच्या गोविंदांचा जल्लोष.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या वतीने साताऱ्याच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवात जावळी तालुक्यातील रिटकवली येथील आई महाकाली माता गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवत जावळीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
रिटकवली गावची ग्रामदैवत व नवसाला पावणारी आई महाकाली माता यांच्या आशीर्वादाने या गोविंदा पथकाने सातारा शहरात दमदार कामगिरी करत दहीहंडी फोडली. या विजयामुळे रिटकवलीसह संपूर्ण जावळी तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जावळीच्या ग्रामीण भागातून आलेल्या या गोविंदा पथकाचे सातारा शहरात मोठ्या उत्साहात कौतुक करण्यात आले.
या दहीहंडी उत्सवाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नामदार शशिकांत शिंदे, माजी सहकार मंत्री तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील काळेकर तसेच शहराध्यक्ष व संयोजक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिटकवली येथील आई महाकाली माता गोविंदा पथकाने थरावर थर रचत उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी फोडली. पथकाच्या या कामगिरीने उपस्थितांच्या जल्लोषाला उधाण आले. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने सातारा नगरी दुमदुमून गेली.
विशेष म्हणजे, जावळी तालुक्यातील एका छोट्याशा गावातून साताऱ्याच्या राजधानीत पोहोचलेल्या रिटकवलीच्या गोविंदा पथकाने मिळवलेला हा मान संपूर्ण जावळीकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. ग्रामीण भागातील युवकांनी एकत्र येत दाखविलेली जिद्द, संघभावना, शिस्त आणि साहस यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रिटकवली ग्रामस्थांच्या वतीने आई महाकाली माता गोविंदा पथकातील सर्व गोविंदांचे अभिनंदन करण्यात आले. गावातील युवकांनी एकजुटीने केलेल्या या कामगिरीमुळे रिटकवलीचे नाव सातारा जिल्ह्यात अभिमानाने घेतले जात आहे.
या प्रसंगी रिटकवली गावचे समाजसेवक, अखिल भारतीय मराठा महासंघ जावळीचे उपाध्यक्ष तथा व्हाईस ऑफ इंडिया संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. नामदेव संतू मर्ढेकर यांनी गोविंदा पथकाचे अभिनंदन करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
“आई महाकाली मातेच्या आशीर्वादाने रिटकवलीच्या गोविंदांनी साताऱ्याच्या राजधानीत दहीहंडी फोडून जावळीचा सन्मान वाढविला आहे. ही कामगिरी संपूर्ण जावळीकरांसाठी अभिमानाची बाब आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
रिटकवलीच्या आई महाकाली माता गोविंदा पथकाच्या या यशामुळे गावासह संपूर्ण जावळी तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, सोशल मीडिया तसेच प्रत्यक्ष भेटीतून गोविंदांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



