डेन्मार्कहून आलेल्या ‘अल्फा लावल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गोकूळ प्राथमिक शाळेची पाहणी; शैक्षणिक प्रगती व भौतिक सुविधांचे केले कौतुक.

सातारा:येथील नामांकित गोकूळ प्राथमिक शाळेला बहुराष्ट्रीय ‘अल्फा लावल’ कंपनीच्या सीएसआर (CSR) टीमने सदिच्छा भेट दिली. या दौऱ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कंपनीचे रिजनल मॅनेजर श्री. रेने क्रेमर यांनी थेट डेन्मार्कहून (Denmark) साताऱ्यातील गोकूळ प्राथमिक शाळेस भेट देऊन शालेय उपक्रमांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. साताऱ्यातील एका प्राथमिक शाळेची शैक्षणिक गुणवत्ता आणि भौतिक सुविधांचे परीक्षण थेट परदेशातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केल्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या विशेष पाहणी दौऱ्यात श्री. रेने क्रेमर यांच्यासमवेत ‘अल्फा लावल’चे हेड – एचआर ऑपरेशन्स श्री. शशिकांत कुमार, प्लांट एचआर हेड श्री. मनोज भस्मे तसेच ऑफिसर एचआर हेड श्रीमती जयश्री पाटील उपस्थित होते. शाळेच्या प्रांगणात आगमन होताच शिक्षकवृंद व चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने सर्व मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले.
भेटीदरम्यान श्री. रेने क्रेमर व संपूर्ण सीएसआर टीमने शाळेतील भौतिक सुविधा, डिजिटल वर्गखोल्या, शैक्षणिक वातावरण आणि वर्गातील अध्यापन पद्धतींचे बारकाईने परीक्षण केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, संवादकौशल्य आणि शिक्षणाचा स्तर जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट मुलांशी हसतखेळत संवाद साधला. परदेशातून आलेल्या पाहुण्यांशी मुलांनी कोणताही आढेवेढे न घेता चुणचुणीतपणे संवाद साधला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शैक्षणिक प्रगती आणि शाळेतील स्वच्छ व समृद्ध परिसर पाहून श्री. क्रेमर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी मनस्वी समाधान व्यक्त करून शाळेच्या कामकाजाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
याप्रसंगी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. भेटीचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शाळेच्या विकासात सातत्यपूर्ण सहकार्य राहील, असा विश्वास यावेळी अल्फा लावलच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. परदेशातून आलेल्या मान्यवरांनी शाळेच्या गुणवत्तेवर समाधानाची मोहर उमटवल्याने पालक आणि परिसरातील नागरिकांमधून गोकूळ प्राथमिक शाळेचे कौतुक होत आहे.



