सातारा हादरले: कलेक्टर ऑफिससमोर दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या!
सातारा हादरले: कलेक्टर ऑफिससमोर दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या!

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी मध्यरात्री एका कुरिअर कंपनीच्या ट्रॅव्हल्सवर दरोडा टाकून तब्बल २५ तोळे सोने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली होती, मात्र सातारा शहर पोलिसांच्या डीबी पथकाने अत्यंत तत्परतेने काम करत अवघ्या १२ तासांच्या आत आरोपींचा शोध लावला आहे.
घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांच्या डीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. पाचही आरोपी मध्यप्रदेश सीमेवरील शिरपूर येथे असल्याची खात्री होताच, सातारा पोलिसांच्या पथकाने तिथे धडक दिली.
शिरपूर परिसरात पोलिसांनी सापळा रचून या पाचही दरोडेखोरांना शिताफीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी लुटलेले २५ तोळे सोनेही जप्त केले असून, या कारवाईमुळे सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. भररस्त्यात झालेला हा दरोडा उधळून लावत आरोपींना बेड्या ठोकल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.



