महाराष्ट्र

अंत्यसंस्कारानंतरही दोन दिवस स्मशानात बसून राहिला बाप माझी निशा पुन्हा उठेल, मला मिठी मारेल

" माझी निशा पुन्हा उठेल, मला मिठी मारेल ” अंत्यसंस्कारानंतरही दोन दिवस स्मशानात बसून राहिला बाप; ठाणे हादरलं.

ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात घडलेली एक अत्यंत हृदयद्रावक घटना सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त करणारी ठरत आहे. पोटच्या लेकीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतरही तिच्या विरहाने व्याकुळ झालेला एक बाप तब्बल दोन दिवस स्मशानभूमीतच बसून राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “माझी निशा पुन्हा उठेल आणि मला मिठी मारेल,” या आशेवर हा दुर्दैवी पिता डोळ्यांत प्राण आणून तिथेच वाट पाहत होता.

दिवा परिसरात राहणाऱ्या नथुराम शिंदे यांची पाच वर्षांची मुलगी निशा हिच्यावर काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. गेल्या महिनाभरापासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि वडिलांची अहोरात्र धावपळ सुरू असतानाच अखेर या चिमुरडीची प्राणज्योत मालवली.

निशाच्या निधनानंतर शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुंबईत अत्यंत शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी आटोपल्यानंतर सर्व नातेवाईक जड अंतःकरणाने परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, नथुराम शिंदे यांनी “मी कागदपत्रे घेऊन येतो, तुम्ही घरी निघा,” असे सांगत सर्वांना परत पाठवले आणि स्वतः मात्र स्मशानातच थांबले.

रात्र उलटून गेली तरी नथुराम घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नाहीत. अखेर नातेवाईक पुन्हा स्मशानभूमीत गेले असता, तिथे दिसलेलं दृश्य पाहून सर्वांचे डोळे पाणावले. स्मशानभूमीच्या बाहेर विमनस्क अवस्थेत बसलेले नथुराम शिंदे, दोन दिवस अन्न-पाण्याविना मुलीच्या आठवणीत तिथेच होते.

नातेवाईकांनी विचारपूस केली असता, “माझी निशा नक्की उठेल… ती मला हाक मारेल आणि मिठी मारेल,” असे हृदय पिळवटून टाकणारे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. पोटच्या गोळ्याच्या विरहाने बापाची झालेली ही अवस्था पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.

या घटनेनंतर दिवा व ठाणे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. भटक्या कुत्र्यांच्या सुळसुळाटामुळे एका निष्पाप चिमुरडीला जीव गमवावा लागला आणि एका बापावर आयुष्यभर न भरून येणारे दुःख ओढवले. प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button