महाराष्ट्र

पालमध्ये लाखो भाविकांचा ‘सदानंदाचा येळकोट’ श्री खंडोबा-म्हाळसाचा विवाह संपन्न.

लाखों भाविकांची उपस्थिती, शाही रथातून भव्य मिरवणूक.

सनई चौघड्यांचे सूर… मंगल आष्टके… भंडारा खोबऱ्याची मुक्त उधळण अन ‘येळकोट… येळकोट…’ जय मल्हार सदानंदाचा… येळकोट’ असा भाविकांकडून होणारा गजर, अशा भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात श्रीक्षेत्र पाल येथे तारळी नदीकाठी शुक्रवार दि.०२ रोजी गोरज मुर्तावर लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेला श्री खंडेराया महांळसाशी विवाहबध्द झाला.

*लाखो भाविकाची परतीकडे वाटचाल*

पाली यात्रेसाठी महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक राज्यातून हरिजन, गिरीजन आणि बहुजन असे लाखों भाविकांचा समुदाय समुदाय उपस्थित होता. दळणवळणाची सोय झाल्यामुळे दूरच्या भाविकांनी विवाह सोहळा होताच परतीचा प्रवास सुरू केला.

थंडी असतानाही या विवाहासाठी लाखों भाविकांनी उपस्थिती लावली होती. भंडारा, खोबऱ्याचा खच पडल्याने तारळी नदीचे वाळवंट पिवळे धमक झाले होते.गेल्या पाच दिवसांपासून खंडोबा-म्हाळसाच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. शुक्रवार हा विवाह सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लाखोच्या संख्येने भाविक व-हाडी मंडळी पाल येथे दाखल झाली होती शुक्रवारी दुपारी देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांच्या घराजवळ सर्व आठ गावचे मानकरी, मानाच्या बैलगाड्या, वाहने घेऊन उपस्थित झाली. त्यानंतर मानकरी देवराज पाटील हे ग्रामप्रदर्शन घालत दुपारी खंडोबा मंदिरात आले. मानकांमधील काहींनी बैलगाड्यांसह ट्रैक्टर या वाहनांचा वापर केला होता. मानाच्या सासनकाठ्या कोल्हापूर येथील चोपदारांचा घोडा त्या पाठोपाठ मुख्य मानकरी देवराज पाटील यांचे मंदिरात आगमन झाले. यावेळी देवराज पाटील यांच्या हस्ते देवाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मानाच्या गाड्यात देवास बसवून ढोल, ताशा आदी वाद्यांच्या गजरात अंधार दरवाजापर्यंत देवाची मिरवणूक काढण्यात आली.

अंधार दरवाजावर जवळ मिरवणूक आल्यानंतर देवराज पाटील हे पोटात बांधलेल्या श्री खंडोबा व म्हाळसा या देवतांचे मुखवटे घेऊन शाही रथावर दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी
विराजमान झाले. त्यानंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ ‘सदानंदाचा येळकोट’ गजर भाविकांकडून सुरू झाला. या मिरवणुकीत सासनकाठ्या, मानाचे गाडे, फुलांनी सजवलेल्या छत्र्या सहभागी झाल्या होत्या. देवालयातून निघालेली मिरवणूक तारळी नदी पात्रात वाळवंटातून नदीच्या पश्चिमेकडील तीरावर पोहोचली. यावेळी भाविकांनी पुन्हा भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यास सुरुवात केली. मानकरी देवाचे मुखवटेबरोबर घेऊन शाही रथातून विवाह समारंभासाठी व-हाडी मंडळी समवेत विवाह मंडपाकडे निघाले होते. सायंकाळच्या सुमारास विवाह मंडपात पोहोचले. मानकरी यांनी देवास बहुल्यावर चढवल्यानंतर पारंपारिक पध्दतीने लाखो भाविकांच्या साक्षीने गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसाचा विवाह सोहळा थाटात पार पडला. यावेळी पुन्हा पुन्हा ‘येळकोट येळकोट’ जयघोष करत भाविकांच्या जनसागरांकडून भंडारा खोबऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली.

त्यामुळे भंडारा खोबऱ्याचा सर्वत्र खच पडला होता. संपूर्ण पाली गावच पिवळ्या धमक भंडाऱ्याने न्हाल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत प्रशासन व उंब्रज ठाणे आणि आरोग्य विभाग सतर्क राहिला होता. यात्रा काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड, आरसीबी पथक त्याचबरोबर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी क्रेनसह वाहतूक पोलीस कर्मचारी, सहा वॉच टॉवर उभारण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, यासह तहसीलदार कल्पना ढवळे तळ ठोकून होते. लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच ध्वनीक्षेपक यांद्वारे यात्रेवर लक्ष ठेवण्यात येत होते.

यात्रेवर ड्रोन कॅमेराची नजर तीर्थक्षेत्र पाल येथील यात्रेसाठी तीन राज्यातून लाखो भावीक उपस्थित राहतात, त्यामुळे देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाने सीसीटीव्ही यंत्रणा उभारून ड्रोन कॅमेरे भाविकांवर लक्ष ठेवले जात होते.

एसटी महामंडळाकडून जादा बसेसः पाल यात्रेसाठी सातारा, सांगली आणि कोल्हापूर विभागातील विविध आगाराच्या ज्याचा एसटी बसेसची खास यात्रेसाठी सोय करण्य करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांच्या प्रवासाची चांगली सोय झाली त्यामुळे भाविक भक्तांनी एस.टी महामंडळाला धन्यवाद दिले.

पोलिसांकडून गर्दीचे अचूक नियंत्रणः मुख्य मंदिर प्रवेशद्वारावर पोलिस पाटलांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन केले, त्यामुळे कोठेही अनुचित घटना घडू शकली नाही. तर साध्या वेशात फिरणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गस्त घालत पोलिसांनी अचूक नियंत्रण केल्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत होते.

टेंभूर्णीच्या भक्ताने उधळला ८०० किलो भंडारा: सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णे येथील उध्दव साळुंखे या भक्तांने यावर्षी जवळपास ८०० किलो भंडाऱ्याची उधळण केली. गेली बारा वर्षे ते कुटुंबियांसोबत कुलस्वामी असलेल्या श्री खंडोबा दर्शनासाठी पाल येथे हजेरी लावतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button