विश्वकर्मा सुपरमार्टमधील गुंतवणूकदारांना आर्थिक गुन्हे शाखेचे जाहीर आवाहन
विश्वकर्मा सुपरमार्टमधील गुंतवणूकदारांना आर्थिक गुन्हे शाखेचे जाहीर आवाहन.

कोडोली (ता. सातारा) येथील विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस व विश्वकर्मा सुपरमार्ट प्रा. लि. तसेच त्यांच्या इतर शाखांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
सदर कंपनीत गुंतवणूक केल्यास १३.५ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ८७४/२०२३ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ मधील कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
तपासाच्या अनुषंगाने, संबंधित कंपनीत आर्थिक किंवा अन्य स्वरूपाची गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदारांनी दि. ०३ जानेवारी २०२६ ते ०९ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा येथे चौकशीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुंतवणूकदारांनी खालील कागदपत्रे सोबत आणावीत :
गुंतवणूक केल्याचा पुरावा (मूळ ठेव पावती, प्रमाणपत्र, संबंधित बँक खात्याचे स्टेटमेंट इ.)
बँक पासबुकच्या पहिल्या पानाच्या स्पष्ट २ झेरॉक्स प्रती
आधारकार्ड व पॅनकार्ड
मिळालेल्या परताव्याचा (अंशतः अथवा पूर्ण) पुरावा
वारसदार असल्यास त्यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड
वरील सर्व कागदपत्रांच्या स्पष्ट २ झेरॉक्स प्रती
सदर तपासाद्वारे गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळविण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम, १९९९ अंतर्गत आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.
दरम्यान, या कंपनीविरोधात दहिवडी पोलीस ठाणे (गु. र. नं. ७६४/२०२३) तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे, जि. पुणे (गु. र. नं. ६६/२०२४) येथेही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये ज्यांनी आधीच संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये जबाब नोंदविले आहेत, त्यांना आर्थिक गुन्हे शाखा, सातारा येथे पुन्हा उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

