धक्कादायक: महामार्ग पोलीस कॉन्स्टेबल संतोष ननावरे यांची पोलादपूर येथे आत्महत्या; सुसाईड नोट सापडली.

पोलादपूर / वाई: पुणे-सातारा महामार्गावरील जोशीविहीर महामार्ग पोलीस मदत केंद्रात सेवेत असलेले पोलीस कॉन्स्टेबल संतोष रामदास ननावरे (वय ३५, रा. ओझर्डे, ता. वाई) यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हद्दीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे उघडकीस आली. घटनास्थळावरून पोलिसांनी एक सुसाईड नोट जप्त केली असून या घटनेमुळे सातारा आणि रायगड पोलीस दलात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
संतोष ननावरे हे गेल्या तीन वर्षांपासून जोशीविहीर केंद्रात कार्यरत होते. आपल्या कर्तव्यदक्ष आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. ३० सप्टेंबरपासून ते रजेवर होते. आज पहाटेच्या सुमारास स्वतःच्या चारचाकी वाहनाने ते पोलादपूर परिसरात गेले आणि तेथे एका झाडाला गळफास लावून त्यांनी आपले आयुष्य संपवले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाची पाहणी व झडती घेताना पोलिसांना त्यांच्याजवळ एक सुसाईड नोट आढळून आली आहे, ज्यामध्ये आत्महत्येची सविस्तर कारणे नमूद असल्याचे समजते.
पोलिसांनी ही सुसाईड नोट ताब्यात घेतली असून त्या पत्रातील मुद्द्यांच्या आधारे पुढील कायदेशीर तपास वेगाने सुरू आहे. एका तरुण आणि कार्यतत्पर कर्मचाऱ्याने अचानक टोकाचे पाऊल उचलल्यामुळे जोशीविहीर पोलीस केंद्रासह वाई तालुक्यावर शोककळा पसरली आहे.



