माणुसकीचा आदर्श! कोल्हापुरात तहानलेल्या वानराने घेतला ‘विकास सकटां’चा आसरा; प्रेमाने पाजले पाणी अन् भरवले अन्न.
"माझ्यासाठी पदापेक्षा जनसेवा महत्त्वाची!" – तहानलेल्या वानराची तहान भागवत पोलीस मित्र विकास सकट यांनी जपली सामाजिक बांधिलकी

(कोल्हापूर प्रतिनिधी)
वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने वन्यजीव अन्नाच्या व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. अशाच एका प्रसंगात कोल्हापूर येथे भटकत आलेल्या एका तहानलेल्या-भुकेलेल्या वानराला पाणी व अन्न देऊन ‘पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य’चे अध्यक्ष विकास सकट यांनी संवेदनशीलतेचे अनोखे दर्शन घडवले.
सातारा जिल्ह्यातील चितळी गावचे मूळ रहिवासी असलेले आणि कामानिमित्त पुणे व कोल्हापूर परिसरात वास्तव्यास असणारे विकास सकट यांच्या वाहनावर अचानक एक तहानलेले वानर येऊन बसले. त्या मुक्या प्राण्याची व्याकुळता क्षणात ओळखून सकट यांनी अजिबात विलंब न करता त्याला फळ, चपाती आणि पेल्यातून पाणी पाजले. वानरानेही मोठ्या विश्वासाने त्यांच्या हातातून पाणी पिऊन आपली तहान भागवली. हा भावूक प्रसंग पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
“माझ्यासाठी पदापेक्षा सहकार्य महत्त्वाचे!”
या घटनेनंतर बोलताना विकास सकट म्हणाले, “सामाजिक सेवा हेच माझे मंदिर आहे. माझ्यासाठी कोणतेही पद मोठे नसून, जनतेला आणि मुक्या जीवांना सहकार्य करणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. वाढत्या उन्हामुळे आणि जंगलांच्या ऱ्हासामुळे प्राण्यांची भटकंती होत आहे. त्यामुळे नागरिकांनी किमान आपल्या घराबाहेर पाण्याचे भांडे आणि थोडे धान्य ठेवावे.”
प्राणीप्रेम अन् सामाजिक बांधीलकीची परंपरा
विकास सकट यांची ही संवेदनशीलता नवी नाही. महामार्गाने प्रवास करताना अपघातग्रस्त कुत्रे किंवा मांजरांचे मृतदेह दिसल्यास, त्यांच्यावरून पुन्हा वाहने जाऊ नयेत म्हणून ते स्वतः गाडी थांबवून त्या प्राण्यांना रस्त्याच्या बाजूला करतात. कोरोनाच्या भीषण काळातही त्यांनी प्लाझ्मा, अन्नधान्य आणि रुग्णांना तातडीची मदत मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. २४ तास जनसेवेसाठी तत्पर राहणाऱ्या विकास सकट यांच्या या प्रामाणिक प्राणीप्रेमाचे आणि कार्याचे सर्वस्तरातून जोरदार कौतुक होत आहे.



