Uncategorized

कुडाळातील शेतातून २०० स्ट्रॉबेरी कॅरेट चोरीला २५ ते ३० हजारांचे शेतकऱ्याचे नुकसान

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार

स्ट्रॉबेरी रोपांचा हंगाम सुरू असतानाच कुडाळ येथील प्रगतशील शेतकरी रवींद्र (बापू)शिंदे यांच्या शेतामधून स्ट्रॉबेरी रोपे पाठविण्यासाठी आणून ठेवलेल्या अंदाजे २०० कॅरेट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.२९) रात्री घडली आहे.या चोरीमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती स्ट्रॉबेरी उत्पादक राजेश उंबरकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

रवींद्र शिंदे यांनी स्ट्रॉबेरीची रोपे तयार करण्यासाठी आपली सुमारे एक एकर जमीन राजेश उंबरकर,अमित उंबरकर व अमित रांजणे यांना दिली आहे.जून महिन्यापासून या शेतामध्ये स्ट्रॉबेरीची रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे.सध्या स्ट्रॉबेरीची रोपे विविध ठिकाणी पाठविण्याचा हंगाम सुरू असल्याने त्यासाठी आवश्यक असलेल्या कॅरेट पुणे येथून आणण्यात आले होते.

मंगळवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी येथील शेतामध्ये स्ट्रॉबेरी रोपे पाठविण्यासाठी सुमारे ३५० कॅरेट आणण्यात आली होती. त्यापैकी अंदाजे २०० कॅरेट मंगळवारी रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याचे राजेश उंबरकर यांनी सांगितले.

तसेच स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी रोपे तयार करण्यापासून ते बाजारपेठेत पाठविण्यापर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो.त्यातच हंगामाच्या सुरुवातीला आवश्यक साहित्याची चोरी झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.

शेतीमध्ये वापरले जाणारे कॅरेट,पाइप,ठिबक सिंचन साहित्य, पंप,औषधे तसेच अन्य साहित्य सुरक्षित ठेवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.रवींद्र शिंदे यांच्या शेतामध्ये जून महिन्यापासून स्ट्रॉबेरी रोपे तयार करण्याचे काम सुरू असून, आजपर्यंत शेतातून कोणतीही वस्तू चोरीला गेली नव्हती. मात्र, मंगळवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

तसेच शेत परिसर अनेकदा गावाच्या मुख्य वस्तीपासून दूर असल्याने रात्रीच्या वेळी चोरट्यांना संधी मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे कुडाळ परिसरातील शेतवस्त्या व शेतशिवारात रात्रीची गस्त वाढवावी,तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतीमाल व शेतीसाठी आवश्यक साहित्याच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनीही शक्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे,प्रकाश व्यवस्था आणि सामूहिक सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त होत आहे.

या चोरीप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे राजेश उंबरकर यांनी सांगितले. चोरीला गेलेल्या कॅरेटचा शोध घेऊन संबंधित चोरट्यांचा तपास करून कारवाई करावी,तसेच शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी,अशी मागणी शेतकरी राजेश उंबरकर यांनी केली आहे.

दरम्यान,चोरीला गेलेल्या कॅरेट कुणाच्या निदर्शनास आल्यास किंवा या घटनेबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास पोलिस प्रशासनाला अथवा संबंधित शेतकऱ्यांना कळवावे,असे आवाहन प्रगतशील शेतकरी रवींद्र बापू शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button