‘राजमाता जिजाऊ’ बसमध्ये स्वच्छता व शिस्त पाळा : छत्रपती संघटनेचे प्रवाशांना आवाहन.

श्रीरामपूर (प्रतिनिधी : अनिल शिंदे) :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर विभागातील कोपरगाव आगारातून धावणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेत स्वच्छता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपण्याचे खंबीर आवाहन छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोपरगाव–शिर्डी–माहूरगड या मार्गावर धावणारी ही बससेवा शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, नेवासा, छत्रपती संभाजीनगर, जालना, मंठा, जिंतूर, औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी आणि पुसद या महत्त्वाच्या शहरांना जोडते. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा हा एक प्रमुख मार्ग असल्याने प्रवाशांसाठी ही बससेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
ऐतिहासिक नावाचा सन्मान जपणे प्रत्येकाचे कर्तव्य ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव केवळ बसला दिलेले नाव नसून त्यामागे महाराष्ट्राच्या प्रेरणादायी वारशाची व संस्कारांची आठवण आहे. त्यामुळे या नावाची प्रतिष्ठा कायम राखणे ही प्रत्येक प्रवाशाची नैतिक जबाबदारी आहे, असे संघटनेने स्पष्ट केले. प्रवासादरम्यान बसमध्ये पाण्याच्या व पेयांच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक वेष्टने, कागद किंवा इतर कचरा टाकून परिसर घाण करू नये. कचरा योग्य ठिकाणी जमा करून सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चालक-वाहकांना सूचना व सहकार्याची विनंती प्रवाशांसोबतच चालक व वाहकांनीही बसमधील स्वच्छता आणि शिस्त टिकवण्यासाठी वेळोवेळी सूचना द्याव्यात व आवश्यक ती काळजी घ्यावी, अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
‘स्वच्छ बस – सुंदर प्रवास – जबाबदार प्रवासी’ या सूत्राचा अंगीकार करून सर्वांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा आणि बस स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध ठेवण्याचा संकल्प करावा, अशी अपेक्षा छत्रपती संघटनेने व्यक्त केली आहे.



