स्वच्छता ही सेवा अंतर्गत कुडाळ येथे स्वच्छता अभियान.
अंगणवाडी,आशा सेविका,CRP यांचा उत्स्फूर्त सहभाग.

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत १ ऑक्टोबर 2026 रोजी ग्रामपंचायत कुडाळच्या वतीने विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.रस्ते,सार्वजनिक परिसर तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणांची स्वच्छता करून स्वच्छ व निरोगी गावाचा संदेश देण्यात आला आहे.
या अभियानात प्रशासक तथा विस्तार अधिकारी (पंचायत) दिगंबर सुरवसे,साहेब बी.आर.सी.चे प्रतिनिधी,ग्रामपंचायत अधिकारी उमेश जाधव,पिंपळबन समितीचे अध्यक्ष महेश पवार,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,CRP तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून केवळ कचरा उचलणे एवढ्यापुरतीच मोहीम मर्यादित न ठेवता नागरिकांमध्ये कचरा रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी न टाकणे,ओला व सुका कचरा वेगळा करणे,प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे याबाबत जनजागृती करण्यात आली.
तसेच गावातील अस्वच्छ परिसरामुळे डास,माशा व अन्य कीटकांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.त्यामुळे नाल्या, रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा साचणार नाही,याची दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.स्वच्छ परिसर हीच निरोगी समाजाची पहिली पायरी असल्याचा संदेश उपस्थितांनी दिला.स्वच्छता अभियान राबवून परिसर पुन्हा अस्वच्छ होऊ नये यासाठी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे.बाजारपेठ,रस्ते,सार्वजनिक ठिकाणे व जलस्रोतांच्या परिसरात प्लास्टिकच्या पिशव्या,बाटल्या व इतर कचरा टाकू नये,तसेच कचरा निश्चित ठिकाणीच जमा करावा, असे आवाहन करण्यात आले.
गावाची स्वच्छता ही केवळ ग्रामपंचायत किंवा शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून ‘माझे गाव,माझी जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येक नागरिकाने सहभाग घेणे गरजेचे आहे.घर, शाळा,अंगणवाडी,सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदरचा स्वच्छतेचा उपक्रम दैनंदिन राबवणे बाबत आवाहन करण्यात आले
ग्रामपंचायत कुडाळच्या वतीने राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती झाली. भविष्यातही स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण संवर्धनाशी संबंधित उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.



