मंत्री बाबाराजेंच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक आयोजित करू:सौरभ (बाबा)शिंदे
विना परवाना सुरू असणाऱ्या भंगार व्यवसायिकांवर तातडीने कारवाई करा:अतिश कदम
कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार
जावली तालुक्यात यावर्षी सुद्धा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांची पिके पाण्यावाचून वाळून चालली आहेत. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत अशी सूचना सभापती सौरभ (बाबा)शिंदे यांनी केली तसेच जावली पंचायत समिती कडील सात कर्मचारी इतर ठिकाणी प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत, पगार मात्र जावलीतून घेत आहेत यावर सभापती शिंदे यांनी जोरदार आक्षेप घेत या कर्मचाऱ्यांना परत माघारी बोलवण्याच्या सूचना गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांना केल्या. तसेच पंचायत समिती सदस्य अतिश कदम यांनी भंगार व्यवसायिकांच्या बाबत प्रश्न उपस्थित करत तात्काळ विनापरवाना सुरू असणाऱ्या भंगार व्यवसायिकांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली. यावर संबंधित विभागांना पत्र व्यवहार करून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना सभापती सौरभ (बाबा)शिंदे यांनी गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांना दिल्या.आखाडे शाळेत अकरा वाजले तरी शिक्षक उपस्थित नव्हते यावरही सभागृहात जोरदार चर्चा झाली.
जावली पंचायत समितीची मासिक सभा सभापती सौरभ (बाबा)शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी उपसभापती गोरख महाडिक,सदस्य शिल्पा शिंदे,सुनीता दुंदळे,आतिश कदम, गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील,सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र सपाटे व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन झाल्यानंतर सभापती सौरभ शिंदे यांनी जावली तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे.सप्टेंबर अखेर 134 मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते मात्र फक्त वीस मिलिमीटर पाऊस पडला असून तरीसुद्धा पिके सुस्थितीत होती मात्र आता पाऊसच नसल्याने सदरची पिके हातातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत व वरिष्ठ कार्यालयाला आपल्या पंचायत समितीच्या भावना कळवाव्यात. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या कानावर गोष्ट घालून जावली तालुक्याची सद्यस्थितीतील पिकांची परिस्थिती समजण्यासाठी खरीप पीक आढावा बैठक आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सौरभ (बाबा)शिंदे यांनी सांगितले.
आखाडे येथील शाळेत अकरा वाजले तरी शिक्षक उपस्थित नव्हते. विद्यार्थी, ग्रामस्थ कुलूपबंद शाळेच्या दारात शिक्षकांची वाट बघत होते या शिक्षकांवर काय कारवाई केली असा प्रश्न सदस्य शिल्पा शिंदे यांनी उपस्थित केला. शिंदे म्हणाल्या शिक्षक एकमेकांना सहकार्य करून शाळेला दांड्या मारत आहेत शिक्षणाबाबत त्यांना गांभीर्य राहिले नाही
पदाधिकारी शाळेत गेले तरी हे शिक्षक त्यांच्याशी उद्धट वागत असतात या शिक्षकांवर कारवाई करा त्यांना जरब बसली पाहिजे रस्त्यावरची शाळा असून सुद्धा शिक्षक असे वागतात एकाच दिवशी दोघेही रजा काढतात हे काय चाललं आहे ?
यावर सभापती व गटविकास अधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांना शिक्षकांना पंचायत समितीत बोलवून घ्या, व त्यांच्यावर कारवाई करा, आमच्या समोर हजर करा असे आदेश दिले.
जावली तालुक्यामध्ये परप्रांतीय भंगार व्यवसायिक मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी.तसेच परवाना नसतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी.जावली तालुक्यातून परप्रांतीय भंगार व्यावसायिक व्यवसायासह हद्दपार करण्यात यावेत.विविध प्रशासनाच्या मार्फत भंगार व्यवसायांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. परप्रांतीय भंगार व्यवसायिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहेत त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष घालून त्वरित कारवाई करावी.
आतिश कदम
पंचायत समिती सदस्य



