जावळी तालुक्यातील मौजे सोमर्डी येथे अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ८,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

प्रतिनिधी श्रीकांत गोळे
वाई/मेढा: जावळी तालुक्यातील मौजे सोमर्डी येथील हुमगाव जाणार्या रस्त्यालगत असलेल्या विटभट्टीच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर वाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि मेढा पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत देशी-विदेशी दारूसह ८,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. सुनील साळुंखे यांना गोपनीय बातमीदाराद्वारे बातमी मिळाली होती की, सोमर्डी येथील एका विटभट्टीच्या आडोशाला एक इसम अवैध देशी-विदेशी दारूची चोरटी विक्री करत आहे. माहितीची खात्री पटताच श्री. साळुंखे यांनी उपविभागीय कार्यालयातील पथकाला कुडाळ दूरक्षेत्र येथे रवाना केले आणि मेढा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील यांना छापा टाकण्याचे आदेश दिले.
त्यानुसार वाई उपविभागीय कार्यालयाचे पथक आणि कुडाळ पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंगटे व त्यांच्या स्टाफने संशयित ठिकाणी अचानक छापा टाकला. या वेळी निलेश हणमंत निकम (वय ३८, रा. सोमर्डी, ता. जावळी, जि. सातारा) हा अवैध दारूची विक्री करताना रंगेहात पकडला गेला.
जप्त केलेला मुद्देमाल:
- देशी दारू (पहिली संत्रा): १८० मि.ली. च्या ३८ बाटल्या आणि ९० मि.ली. च्या १०० बाटल्या.
- विदेशी दारू (मॅकडोवेल्स नंबर १ / मॅक डिलाईट व्हिस्की): १८० मि.ली. च्या १० बाटल्या.
- एकूण किंमत: ₹८,५४०/-
या प्रकरणी आरोपीविरुद्ध मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कुडाळ दूरक्षेत्रचे पो.हे.कॉ. यादव करत आहेत.
अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहणार:
तालुक्यात अवैध दारू विक्रीविरुद्ध यापुढेही सातत्याने कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय आपल्या परिसरातील अवैध दारू विक्रीबाबत थेट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वाई येथे माहिती द्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे यांनी केले आहे.
कारवाईत सहभागी पथक:
सदरची यशस्वी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पो.हे.कॉ. अजित जाधव, पो.कॉ. शिंदे, तसेच कुडाळ पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंगटे, पो.हे.कॉ. निकम, पो.कॉ. गुरव आणि पो.कॉ. वाघमळे यांच्या पथकाने केली.



