भंगाराच्या शेडमध्ये तलवारी नाचल्या;दोन गटांत राडा!
एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न; परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कुडाळ प्रतिनिधी प्रसन्न पवार
कुडाळ परिसरातील एका भंगार व्यवसायाच्या शेडमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे.रात्रीच्या वेळी शेडमध्ये काही व्यक्तींच्या हातात तलवारीसदृश धारदार शस्त्रे दिसत असून,संबंधित व्यक्ती एकमेकांच्या दिशेने धावून जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,भंगार व्यवसायाशी संबंधित व्यक्तींमध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला.पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीच्या परिस्थितीत निर्माण झाले.यावेळी तलवारीसदृश शस्त्रे बाहेर काढण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.काही व्यक्ती एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दृश्य दिसत आहे.
विशेष म्हणजे,हा प्रकार रात्रीच्या वेळी भंगाराच्या शेडमध्ये घडल्याचे व्हिडिओतील दृश्यांवरून दिसत आहे.शेडच्या आजूबाजूला नागरिकांची वर्दळ असताना अशा प्रकारे धारदार शस्त्रे उगारली जात असतील,तर भविष्यात गंभीर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न
भंगार व्यवसायाच्या ठिकाणी वारंवार वाद,गर्दी अथवा कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्यास प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.शस्त्रे घेऊन सार्वजनिक परिसरात अशा प्रकारे वाद घालण्याच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासन आता तरी कारवाई करणार का?
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होणार का, तसेच भंगार शेडमध्ये अशा प्रकारे धारदार शस्त्रे कशी पोहोचली,याची चौकशी होणार का,असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.पोलिस प्रशासनाने व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित व्यक्तींची ओळख पटवावी आणि घटनेमागील नेमके कारण शोधून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
दरम्यान, व्हिडिओतील व्यक्तींची ओळख आणि वादाचे कारण याबाबत अधिकृत पोलिस माहिती अद्याप उपलब्ध नसल्यास, त्याची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.



