छत्रपती संघटनेतर्फे पर्यावरण संवर्धन उपक्रम; शेतकरी वसंत शिंदे यांच्या पुढाकाराने झाडांचे वाटप.

(जावळी प्रतिनिधी)श्रीकांत गोळे
पर्यावरण संवर्धन, हरित महाराष्ट्र आणि भावी पिढ्यांसाठी निरोगी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने “झाडे लावा, झाडे जगवा” हा जनजागृतीपर उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या झाडांचे वाटप करण्यात आले. शेतकरी वसंत शिंदे यांनी या सामाजिक उपक्रमात विशेष पुढाकार घेत पर्यावरण रक्षणाचा मोलाचा संदेश दिला.
वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग), जंगलतोड आणि अनियमित पाऊस यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन हाच सर्वात प्रभावी उपाय आहे. झाडांमुळे शुद्ध प्राणवायू मिळण्यासोबतच मातीची धूप थांबते आणि निसर्गाचा समतोल राखला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे, असा सूर या कार्यक्रमात उमटला.
यावेळी शेतकरी वसंत शिंदे यांनी फळझाडे, औषधी वनस्पती आणि सावली देणाऱ्या वृक्षांचे महत्त्व पटवून दिले. “शेती, पर्यावरण आणि मानवी आरोग्य यांचा अतूट संबंध आहे. झाडे हा भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
छत्रपती संघटना ही केवळ सामाजिक प्रश्नांवरच नव्हे, तर शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनासाठीही सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही अशा अनेक पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात आली. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची नैतिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य संघटना प्रमुख श्री. तृशांत भाई शेलार, उपसंघटना प्रमुख श्री. तानाजी भाऊ किर्दत, महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती मुक्ताताई लोहार यांच्यासह संदीप भोसले, परशुराम वाघमारे, शेखर जाधव, अभिषेक शेलार, श्रीकांत गोळे, सचिन गाडे, अनिल केसकर, विठ्ठल कदम, मोहन खुडे, प्रथमेश भोकरे आणि संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



