कास–अंधारी रस्त्याच्या सुधारणेला युद्धापातळीवर सुरुवात; स्थानिक नागरिक अन् पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण!
खड्ड्यांच्या त्रासातून सुटका! कास–अंधारी रस्त्याच्या दुरुस्तीमुळे शेतकरी, विद्यार्थी अन् पर्यटकांना मोठा दिलासा

कास, ता. जावळी (प्रतिनिधी):श्रीकांत गोळे
अनेक वर्षांची प्रतीक्षा अन् सातत्याने झालेला पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला आहे! जावळी तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा कास–अंधारी रस्ता आता कात टाकणार असून, या मार्गाच्या सुधारणा व मजबुतीकरणाच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मा. निखिल पवार साहेब व मा. महेश कोणाळकर साहेब यांच्या थेट देखरेखीखाली हे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने सुरू असल्याने, खड्ड्यांच्या त्रासाने हैराण झालेल्या नागरिक, शेतकरी अन् पर्यटकांमध्ये कमालीच्या आनंदाचे वातावरण आहे.
पावसाळ्यात या रस्त्यावर पडलेले भलेमोठे खड्डे, वाहतुकीतील अडथळे आणि प्रवाशांची होणारी दैना यामुळे हा मार्ग धोकादायक बनला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येची दखल घेत प्रत्यक्ष कामाला गती दिली आहे. रस्त्याचे समतलीकरण, मजबुतीकरण आणि पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना शिस्तबद्ध पद्धतीने राबवल्या जात आहेत. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता कंत्राटदार आणि कामगार सुरक्षिततेचे नियम पाळून वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
पर्यटन अन् स्थानिक अर्थकारणाला मिळणार ‘बूस्टर’ जागतिक वारसा स्थळ असलेले कास पुष्प पठार, कास तलाव आणि निसर्गरम्य परिसरामुळे दरवर्षी हजारो पर्यटक या मार्गावरून प्रवास करतात. रस्ता सुस्थितीत आल्याने पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी तर होईलच, शिवाय स्थानिक शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदारांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे. शेतीमालाची वाहतूक गतिमान होऊन परिसराच्या सामाजिक व आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.

- प्रशासनाच्या तत्परतेचे चौफेरातून कौतुक!
- प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि कामाच्या उच्च दर्जाबद्दल स्थानिक नागरिकांनी मा. निखिल पवार साहेब, मा. महेश कोणाळकर साहेब, कंत्राटदार व कामगारांचे आभार मानले आहेत. तसेच, लोकहिताच्या या महत्त्वाकांक्षी कामाबद्दल ‘छत्रपती संघटना, महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीनेही संपूर्ण अधिकारी वर्ग व यंत्रणेचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, ग्रामीण भागातील विकासाचा हा झंझावात असाच सुरू राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



