जांभळेवाडी येथील नंदा जांभळे ठरल्या होम मिनिस्टरच्या पहिल्या मानकरी.
तर रेणुका करंजकर व राणी बामणे यांनी पटकावला दुसरा व तिसरा क्रमांक ; गणेशोत्सवानिमित्त खेळ पैठणीचा उत्साहात.

जांभळेवाडी (कण्हेर) ता.सातारा येथील गणेशोत्सवानिमित्त नेहरू युवा मंडळाने खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमांमध्ये सौ. नंदा अरुण जांभळे यांनी पैठणी साडी पटकावून त्या होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या. तसेच सौ. रेणुका ओंकार करंजकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावून मिक्सर सेट मिळवला, तर सौ. राणी संदीप बामणे यांनी तृतीय क्रमांक पटकावून प्रेशर कुकरचे बक्षीस मिळवले. यावेळी विजेत्यांना ग्रामपंचायत सदस्या शारदा वाघमळे व मुक्ताबाई पवार यांच्या हस्ते, तसेच ग्रामस्थ, मंडळांचे युवक व महिला यांच्या उपस्थितीत बक्षीसे देण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष करीत जल्लोष साजरा केला.
दरम्यान गणेशोत्सवानिमित्त ‘होम मिनिस्टर तथा खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन खास महिलांसाठी करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, शरीरातून रिंग पासिंग करणे, कप गोळा करणे आशा विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमधून अनेक राऊंडमधील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. प्रथम क्रमांकाचे बक्षीस हॉटेल जलसागरचे मालक अरुण कापसे यांच्याकडून पैठणी साडी, दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस माजी उपसरपंच गणेश निंबाळकर यांच्याकडून मिक्सर सेट व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस युवा उद्योजक किरण पवार यांच्याकडून कुकर बक्षीस देण्यात आला. तसेच स्पर्धेतील प्रत्येक महिलेस गणेश मंडळाकडून उत्तेजनार्थ विशेष बक्षीस देण्यात आले. या उपक्रमासाठी नेहरू युवा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी सरपंच योगेश जांभळे, अंकुश जाधव, मंडळाचे अध्यक्ष अविनाश करंजकर, महेश पवार, अंकुश शेलार, तुषार सणस, अनिल जांभळे, मनोज मोरे, शुभम जांभळे, अरविंद पवार, मंगल जांभळे, मोनिका पवार, सोनल मोरे, प्रियंका बामणे, वंदना जांभळे, उषा मोरे, कोमल बामणे, कीर्ती करंजकर, पुष्पा जांभळे, आशा जांभळे, एकनाथ सणस, गणपत पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तुषार जांभळे यांनी केले. प्रस्ताविक जोतिराम पवार यांनी केले. आभार सचिन जांभळे यांनी मानले.



