मेढ्यात पोलिसांची जातीय दंगा काबू रंगीत तालीम.
डीसीसी बँक निवडणूक, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च;कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा निर्धार.

कुडाळ प्रतिनिधी:प्रसन्न पवार
आगामी डीसीसी बँक निवडणूक तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेढा शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मेढा पोलिसांनी जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेतली. मेढा चौक येथे झालेल्या या सरावामुळे पोलिस यंत्रणा संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचा संदेश नागरिकांना देण्यात आला.
रंगीत तालीमेदरम्यान उपस्थित अधिकारी व अंमलदारांना जातीय दंगा,जमाव नियंत्रण,आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिस दलाने समन्वयाने व तत्परतेने कारवाई करण्याच्या दृष्टीने सराव घेण्यात आला.
रंगीत तालीम पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून मेढा शहरातून रूट मार्च काढण्यात आला.मेढा चौक येथून सुरू झालेला रूट मार्च चांदणी चौक,कुंभारवाडा,तहसील कार्यालय,कोयना हॉटेल चौक,वेण्णा चौक मार्गे पुन्हा मेढा चौक आणि त्यानंतर मेढा पोलीस ठाणे असा पार पडला.रूट मार्चच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आगामी सण-उत्सव आणि निवडणुकीच्या काळात शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले.
या रूट मार्चमध्ये मेढा पोलीस ठाण्याकडील १ अधिकारी,१२ पोलीस अंमलदार व १५ होमगार्ड, वाई पोलीस ठाण्याकडील १ अधिकारी व ३ पोलीस अंमलदार, पाचगणी पोलीस ठाण्याकडील २ अंमलदार व २ होमगार्ड,भुईंज पोलीस ठाण्याकडील ४ अंमलदार, तर महाबळेश्वर पोलीस ठाण्याकडील १ अधिकारी,३ अंमलदार व १ होमगार्ड सहभागी झाले होते.याशिवाय ४ शासकीय वाहने आवश्यक साहित्यांसह उपस्थित होती.गणेशोत्सव आणि निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा अथवा चुकीची माहिती पसरवली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.
सण-उत्सवाच्या काळात वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, मिरवणुकांचे मार्ग, संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्त तसेच संभाव्य अनुचित घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रंगीत तालीम व रूट मार्चमुळे मेढा शहरात पोलिस बंदोबस्ताची चोख तयारी असल्याचे चित्र दिसून आले. आगामी डीसीसी बँक निवडणूक आणि गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संवेदनशील काळात पोलिसांची दक्षता
डीसीसी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येत असताना गणेशोत्सवाचाही उत्साह सुरू आहे.त्यामुळे कोणत्याही कारणातून वाद,अफवा,गैरसमज अथवा जमावाच्या माध्यमातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, तसेच शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही प्रकारावर तत्काळ कारवाई केली जाईल,असा अप्रत्यक्ष इशाराही दिला. त्याचवेळी सर्व समाजघटकांनी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.



