Uncategorized

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सातारा नगरपालिकेचा पुढाकार; उत्कृष्ट मंडळांना ५ हजारांचे प्रोत्साहनपर बक्षीस.

सातारा प्रतिनिधी: सातारा शहरातील गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक, शाश्वत आणि सामाजिक प्रबोधन करणारा व्हावा, यासाठी सातारा नगरपालिकेने विशेष उपक्रम हाती घेतले आहेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, पारंपरिक वाद्यांचा वापर, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनपर देखावे यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिली.
गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनी मर्यादांचे पालन करण्याबाबत मंडळांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. तसेच डीजे व इलेक्ट्रॉनिक ध्वनी व्यवस्थेऐवजी ढोल-ताशा, लेझीम, हलगी, टाळ, मृदंग आदी पारंपरिक वाद्यांच्या वापरास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

शाडू माती अथवा पर्यावरणास अनुकूल साहित्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्तींचा वापर वाढविण्यासाठीही जनजागृती करण्यात येणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळण्याचे आवाहन करण्यात येणार असून, पंचमहाभुते, पाणी बचत, वृक्षसंवर्धन, जैवविविधता, प्लास्टिकमुक्ती, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत, नदी संवर्धन व स्वच्छता अशा विषयांवरील समाजप्रबोधनपर पर्यावरणपूरक देखाव्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

उत्कृष्ट मंडळांना ५ हजारांचे बक्षीस..
पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत ध्वनी प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणपूरक मूर्ती, पारंपरिक वाद्यांचा वापर, पर्यावरण संवर्धनाचा संदेश, कचरा वर्गीकरण व व्यवस्थापन, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि पर्यावरणपूरक देखावा या बाबींचे मूल्यांकन केले जाणार आहे.

उत्कृष्ट १० पर्यावरणपूरक गणेशोत्सव व देखाव्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये, ध्वनी प्रदूषण नियंत्रण व पारंपरिक वाद्यांचा प्रभावी वापर करणाऱ्या पात्र मंडळांना प्रत्येकी ५ हजार रुपये, तसेच उत्कृष्ट १० पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्तींना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचे प्रस्तावित आहे.
सातारा नगरपरिषद व वाहतूक पोलिसांची आवश्यक मंजुरी घेणाऱ्या पात्र गणेश मंडळांनाच अधिकृत समितीमार्फत या प्रोत्साहनपर बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे सातारा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सकारात्मक संस्कृती निर्माण होऊन पर्यावरण संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती होईल, असा विश्वास नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी व्यक्त केला.

दोन्ही राजेंच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक उपक्रम..
बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरातील गणेश मंडळांसाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच गणेशोत्सवाची परंपरा अधिक शाश्वत आणि समाजप्रबोधनात्मक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button