Uncategorized

हल्ल्याचा प्रयत्न करणारा तरस जेरबंद वडोलीत ग्रामस्थांची सतर्कता; वन विभागाच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला

जावळी प्रतिनिधी:- श्रीकांत गोळे.

कोपर्डे हवेली : वडोली निळेश्वर, ता. कराड येथील पील म्हवटी शिवारात रविवारी सकाळी ग्रामस्थांच्या अंगावर धावून आलेल्या जखमी तरसाला वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने शिताफीने पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांची सतर्कता आणि वन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठा धोका टळला.

रविवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास मोहन कोळी हे शेताकडे जात असताना अचानक एक तरस त्यांच्या अंगावर धावून आला. कोळी यांनी आरडाओरडा करत त्याच्यापासून बचाव करण्यासाठी धाव घेतली. मात्र, तरसाने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. हा प्रकार संजय पवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ मोहन कोळी यांच्या मदतीसाठी धाव घेतली.

तरसाचा आक्रमक पवित्रा लक्षात आल्यानंतर संजय पवार यांनी प्रसंगावधान राखत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. धाडसाने त्यांनी तरसाचे पाय दोरीने बांधून त्याला नियंत्रित केले आणि तातडीने वन विभागाला घटनेची माहिती दिली.
दरम्यान, या तरसाने यापूर्वीही परिसरात धुमाकूळ घातल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बाबुराव पवार यांच्या म्हशींच्या कळपात तसेच मानसिंग मदने यांच्या शेळ्यांच्या कळपात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न या तरसाने केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाने रेस्क्यू पथकाला तातडीने घटनास्थळी पाठविले. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या सूचनेनुसार तसेच वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने रेस्क्यू मोहीम राबविली. वनपाल सुहास भोसले, वनरक्षक सानिका घाटगे तसेच रेस्क्यू टीमचे सदस्य रोहित कुलकर्णी, शशिकांत जाधव आदींनी तरसाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

तरस अचानक मानवी वस्तीत आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखले आणि वन विभागाचे पथकही तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे तरसाला सुरक्षितपणे ताब्यात घेता आले आणि मोठा धोका टळला.”
— अविनाश डुबल, ग्रामस्थ, वडोली निळेश्वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button