Uncategorized

मॉडिफाय सायलेन्सरचा ‘दणका’! सातारा-कराड पोलिसांचा बुलडोझर रोलर, ६७७ गाड्यांवर धडक कारवाई.

सायरन, फॅन्सी नंबर प्लेट अन मॉडिफाय सायलेन्सर… सातारा वाहतूक पोलिसांचा दणका; विद्यानगर अन् पोवई नाक्यावर धुराळा!

मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोझर! सातारा-कराडमध्ये वाहतूक पोलिसांचा एकाच वेळी कारवाईचा धडाका

कराड : मॉडिफाय सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर करून रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या वाहनचालकांना आता वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. सातारा आणि कराडमध्ये पहिल्यांदाच सातारा वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने समन्वय साधत एकाच वेळी कारवाईचा धडाका लावला. जप्त केलेले मॉडिफाय सायलेन्सर कराडच्या विद्यानगर येथे बुलडोझरखाली अक्षरशः चिरडून नष्ट करण्यात आले. साताऱ्यातही पोवई नाका येथे जप्त सायलेन्सर अशाच पद्धतीने नष्ट करण्यात आले.

या विशेष कारवाईत मॉडिफाय सायलेन्सरचे २८१, फॅन्सी नंबर प्लेटचे १७०, प्रेशर हॉर्नचे १८३ आणि सायरनचे ४३ असे एकूण 677 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस, कराड शहरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे तसेच सातारा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.

मॉडिफाय सायलेन्सरमुळे निर्माण होणारा कर्णकर्कश आवाज, नियमबाह्य हॉर्न, सायरन आणि फॅन्सी नंबर प्लेटमुळे होणारे नियमांचे उल्लंघन याविरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.

कारवाई करून सोडणार नाही, तर जप्त केलेले सायलेन्सरच नष्ट करू असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. यापुढेही मॉडिफाय सायलेन्सर बसविणे, नियमबाह्य आवाजाचे हॉर्न अथवा सायरन वापरणे आणि फॅन्सी नंबर प्लेट लावणे सुरूच ठेवल्यास संबंधित वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
विशेष म्हणजे सातारा आणि कराडसह जिल्हा वाहतूक शाखेच्या समन्वयातून पहिल्यांदाच अशा पद्धतीने एकाच वेळी कारवाई करण्यात आल्याने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button