Uncategorized

मेढ्यात गणेशोत्सवासाठी प्रशासनाची ‘ॲक्शन प्लॅन’ बैठक; महाप्रसादासाठी ‘फूड लायसन्स’ सक्तीचे, नियम मोडल्यास पोलीस कारवाई अटळ.

जावळीत गणेशोत्सवासाठी प्रशासन सतर्क; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाईचा इशारा.

मेढा प्रतिनिधी: श्रीकांत गोळे

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मेढा पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. उत्सवाच्या काळात शांतता, सुरक्षितता आणि शिस्त राखण्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणेने कडक नियमावली जाहीर केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

बैठकीतील प्रमुख सूचना व नियमावली:

  • पूर्वपरवानगी अनिवार्य: गणेशमूर्तीची स्थापना, मंडप उभारणी आणि मिरवणुकीसाठी प्रशासनाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. वाहतुकीस अडथळा ठरेल अशा ठिकाणी मंडप घालण्यास पूर्ण मनाई करण्यात आली आहे.
  • डीजेवर बंदी व पारंपरिक वाद्ये: उत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटावर पूर्णपणे बंदी असेल. मंडळांनी केवळ पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा.
  • महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य: मिरवणूक किंवा उत्सवादरम्यान महिलांची छेडछाड, मद्यप्राशन करून गोंधळ घालणे किंवा हाणामारीचे प्रकार घडल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल केले जातील.
  • महाप्रसादासाठी ‘फूड लायसन्स’ आवश्यक: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आयोजित करणाऱ्या महाप्रसादासाठी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) ‘फूड लायसन्स’ घेणे कंपल्सरी करण्यात आले आहे. लायसन्स नसल्यास कायदेशीर कारवाई होईल.
  • सोशल मीडियावर लक्ष: आक्षेपार्ह मजकूर, अफवा किंवा जातीय भावना भडकवणारे मेसेज सोशल मीडियावर पोस्ट किंवा व्हायरल करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची कडक नजर असणार आहे.

या बैठकीत तहसीलदार प्रवीण मुद्गुल यांनी सर्व मंडळांना स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले, तर मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल असा सज्जड दम दिला.

पोलीस पाटलांचा गौरव: तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि विशेष कामगिरी बजावणाऱ्या पोलीस पाटलांचा या बैठकीदरम्यान प्रशासनाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

बैठकीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगटे, पोलीस हवालदार सुनील वाघमळे, ओंकार दीक्षित यांच्यासह तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते आणि पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button