Uncategorized

सृष्टीच्या मृत्यूने खळबळ !: रयत शिक्षण संस्थेकडून ‘हायलेव्हल’ चौकशी, 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेर आढावा

सातारा YCIS वसतिगृह दुर्घटना: विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर रयत शिक्षण संस्था ॲक्शन मोडमध्ये; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, अधीक्षकांना सक्तीची रजा.

सातारा: सातारा येथील नामांकित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (YCIS) च्या वसतिगृहात घडलेल्या सृष्टी भानुदास बिरामणे (वय १९, रा. आंबळे, ता. महाबळेश्वर) या विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर रयत शिक्षण संस्था पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली आहे. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून संस्थेने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत तीन सदस्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वसतिगृह अधीक्षकांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, वसतिगृहातील इतर सुमारे २०० विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दयानंद म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत या सर्व निर्णयांची अधिकृत माहिती दिली. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे आणि प्राचार्य डॉ. सुभाष साळुंखे उपस्थित होते.

मानसिक तणावातून टोकाचे पाऊल?

सृष्टीने १ जुलै २०२६ रोजी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. संस्थेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक तणावाबाबतची एक तक्रार नोंदवली गेली होती आणि ही बाब पालकांपर्यंत पोहोचल्याने ती नाराज होती. याच मनस्तापातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण काय? आणि त्या दिवशी नक्की काय घडले? हे पोलीस तपास आणि चौकशी समितीच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

वसतिगृहात सुरक्षा ऑडिट सुरू; जाळ्या बसवण्याचे काम वेगात

या घटनेनंतर संस्थेने वसतिगृहातील सुरक्षेच्या त्रुटी शोधण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षेचा फेरआढावा घेत आवश्यक त्या संवेदनशील ठिकाणी तातडीने संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल केले जात आहेत.

 

निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा

या दुर्दैवी घटनेनंतर विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कारवाई आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.

संस्थेने या मागण्यांची दखल घेतली असून, “चौकशीत कोणाचाही निष्काळजीपणा आढळल्यास त्याच्यावर कोणतीही गय न करता कठोर कारवाई केली जाईल,” असे प्रशासनाने ठामपणे सांगितले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button