सायगाव विभागात भाजपचा नवा ‘मास्टरस्ट्रोक’? स्वीकृत सदस्यपदासाठी माजी सैनिक इंद्रजित भिलारे आघाडीवर; ज्येष्ठांचा शिवेंद्रसिंहराजेंकडे तगादा!

सायगाव / कुडाळ: प्रतिनिधी श्रीकांत गोळे.
ग्रामविकास विभागाने पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदाचा मार्ग मोकळा करताच जावळी तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सायगाव विभागाला भक्कम नेतृत्व मिळवून देण्यासाठी आणि भाजपचे संघटन तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी माजी सैनिक व युवा कार्यकर्ते इंद्रजित भिलारे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या भिलारे यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी एकमुखी मागणी भागातील ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.
कुडाळ गटात ‘फायरब्रँड’ काम, तरुणांची भक्कम साथ
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये इंद्रजित भिलारे यांनी कुडाळ गटात पायाला भिंगरी बांधून प्रचार यंत्रणा राबवली होती. गावोगावी जाऊन युवकांचे जाळे विणणे आणि पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. सायगाव, कुडाळ आणि भणंग या तीनही विभागांतील तरुणांना एकत्र आणून त्यांनी मजबूत संघटन उभे केले आहे.
माजी सैनिकाची शिस्त अन् संघटन कौशल्य
भारतीय सैन्य दलातील प्रदीर्घ सेवेनंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय झालेल्या भिलारे यांच्याकडे शिस्त, नियोजन आणि नेतृत्वाचा अनुभव आहे. सायगाव विभागातून सध्या दोन महिला स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेतृत्व करत असल्याने, या भागातून एका धडाडीच्या तरुण चेहऱ्याला संधी मिळणे गरजेचे मानले जात आहे. लष्करी शिस्त असणारा लोकप्रतिनिधी मिळाल्यास पंचायत समितीच्या कारभारालाही वेग येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
ज्येष्ठ नेत्यांचा शिवेंद्रसिंहराजेंकडे पाठपुरावा
इंद्रजित भिलारे यांच्या नावासाठी जावळीतील प्रमुख नेत्यांनी कंबर कसली आहे. प्रतापगड कारखान्याचे माजी संचालक भानुदास गायकवाड, विद्यमान संचालक विठ्ठल मोरे, भाजप किसान मोर्चाचे जावळी तालुकाध्यक्ष राहुल माने, बाबा साळेकर, ला. बा. पतसंस्थेचे संचालक नितीन मोरे आणि विष्णू करंजकर या दिग्गजांनी भिलारे यांच्या नावाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
सायगाव विभागातील युवकांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि भाजपची ताकद वाढवण्यासाठी इंद्रजित भिलारे यांच्या गळ्यात स्वीकृत सदस्यपदाची माळ पडणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



