सातारा तालुका पोलीस ठाण्यातर्फे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळांची मार्गदर्शन बैठक संपन्न.

सातारा तालुका पोलीस ठाण्यातर्फे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळांची मार्गदर्शन बैठक संपन्.
सातारा: आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, शिस्तीत आणि सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस पाटील, सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्षांची संयुक्त मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक ०१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी २.०० या वेळेत राधिका रोडवरील कदम पेट्रोल पंपा समोरील मल्टीपर्पज हॉल येथे पार पडली.
सदर बैठकीस सुमारे ४७५ ते ५०० गणेश मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सरपंच, शांतता कमिटी सदस्य व पोलीस पाटील उपस्थित होते. बैठकीला एम.एस.ई.बी. ग्रामीण विभागाचे उपअभियंता श्री. विवेक पाटील, नायब तहसीलदार श्री. वैभव कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. आंबेकर, धर्मादाय कार्यालयाचे निरीक्षक श्री. सुनील माने, सपोनि श्री. चंद्रहार पाटील व कारकून श्री. तुषार पोळ हे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांना गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या परवानग्या, आवश्यक कागदपत्रे आणि घ्यावयाची खबरदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निलेश तांबे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खालील महत्त्वाच्या सूचना व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले:
- परवानगी व नोंदणी: सर्व मंडळांनी अधिकृत नोंदणी व परवानग्या वेळेत पूर्ण करून घ्याव्यात. मंडप उभारणी करताना रस्ता व वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- सुरक्षा व CCTV: मंडप परिसरात व प्रवेशद्वारावर CCTV कॅमेरे बसवावेत. स्वयंसेवकांची यादी तयार करून त्यांची नावे, फोटो व मोबाईल नंबर दर्शनी भागात लावावेत. तसेच कार्यकर्त्यांनी बॅज वापरणे अनिवार्य आहे.
- विद्युत व अग्निसुरक्षा: विद्युत वायरिंग अधिकृत तंत्रज्ञाकडून करून घ्यावी. डीजी सेट व इंधन साठा सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि मंडपात अग्निशामक यंत्रणा सज्ज ठेवावी.
- ध्वनी व वेळ मर्यादा: ध्वनिक्षेपकाचा वापर शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत व ध्वनीमर्यादेतच करावा.
- सामाजिक उपक्रम व देखावे: देखाव्यांचे विषय सामाजिक प्रबोधन करणारे असावेत. अश्लील, आक्षेपार्ह किंवा धार्मिक भावना दुखावणारे फलक, गाणी व कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी असेल.
- सोशल मीडिया व नियम: सोशल मीडियावर अफवा किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश पसरवू नयेत. दारू, मटका किंवा कोणत्याही बेकायदेशीर कृत्य आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.
- गर्दी व विसर्जन व्यवस्थापन: दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या वेगळ्या रांगा कराव्यात. विसर्जन मिरवणुकीत शिस्त राखून पोलीस प्रशासनाने ठरवून दिलेल्या मार्गाचा व विसर्जन स्थळांचाच वापर करावा.
- ग्रामसुरक्षा दल: प्रत्येक गावात कमीत कमी १० ते १५ तरुणांचे ग्रामसुरक्षा दल स्थापन करावे. रात्रीच्या गस्तीसाठी त्यांना टी-शर्ट, शिट्टी, लाठी व बॅटरी पुरवण्यात यावी.
- सर्व सरपंच, उपसरपंच यांनी आपल्या गावामध्ये डॉल्बी बंदचा ठराव पास करून घ्यावा असे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे*
गणेशोत्सव हा श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि शांततेचा उत्सव असल्याने सर्वांनी ‘शांतता, शिस्त व सुरक्षितता’ या त्रिसूत्रीचा अवलंब करून पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केले.



