Uncategorized

पत्रकाराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…

जावली तालुक्यात व्हॉइस ऑफ मीडिया आणि डिजिटल मिडिया आक्रमक मेढा पोलिस स्टेशनला दिले निवेदन

मेढा प्रतिनिधी:-श्रीकांत गोळे.

कुडाळ येथील भंगार व्यावसायिकाने पत्रकार प्रसन्न पवार यांना दमदाटी व अरेरावीची भाषा केल्याच्या कथित प्रकाराचा ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ आणि जावली तालुका डिजिटल मीडिया संघटने कडून निषेध व्यक्त केला असून,संबंधित प्रकाराची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी मेढा पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याचबरोबर संबंधित भंगार व्यवसाय कोणत्या नियमांच्या आधारे सुरू आहे,व्यवसायासाठी आवश्यक परवानग्या आहेत का,तसेच भंगार खरेदी-विक्रीची नोंद व्यवस्थित ठेवली जाते का,याचीही प्रशासनाने तपासणी करावी,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पत्रकाराला धमकी अथवा दमदाटी करून बातमीदारीवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असेल,तर तो केवळ एका पत्रकाराचा प्रश्न नसून स्वतंत्र पत्रकारितेच्या अधिकारावर गदा आणणारा प्रकार आहे.त्यामुळे अशा घटनांकडे पोलिस प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

तसेच कुडाळ परिसरासह जावली तालुक्यातील भंगार व्यवसायाबाबत नागरिकांकडून विविध प्रश्न उपस्थित होत असून,भंगार साहित्य कोठून खरेदी केले जाते,त्याची ओळख व नोंद ठेवली जाते का,संशयास्पद साहित्याची खरेदी होत नाही ना,वजनकाटा व व्यवहाराची पावती दिली जाते का,याची संबंधित विभागाने तपासणी करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विशेषतः चोरीचे अथवा संशयास्पद स्वरूपाचे

लोखंड,केबल,विद्युत साहित्य किंवा इतर माल भंगार म्हणून स्वीकारला जात नाही ना,याची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अशा व्यवसायांच्या व्यवहारांची नियमित तपासणी होणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तसेच भंगार साहित्य रस्त्यालगत अथवा सार्वजनिक जागेत साठविले जात असल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. याबाबत जागा मालकांना प्रशासनाकडून सक्त ताकीद देण्यात यावी अशी मागणी सध्या स्थानिक नागरिक व शेतकरी करू लागले आहेत.लोखंडी, ज्वलनशील अथवा धोकादायक साहित्याची साठवणूक करताना अग्निसुरक्षा व पर्यावरणीय नियमांचे पालन केले जाते का,याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भंगार व्यवसायासाठी आवश्यक स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी,व्यवसाय परवाना,जागेचा वापर, अग्निसुरक्षा,कचरा व धोकादायक साहित्याची विल्हेवाट तसेच लागू असलेल्या इतर नियमांचे पालन केले जाते का,याची प्रशासनाने संयुक्त तपासणी करावी,अशी मागणी होऊ लागली आहे.

दरम्यान, ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ जावली तालुका संघटना तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने मेढा पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.तसेच जावळी तालुक्यातील संबंधित व्यवसायाची अधिकृत परवानगी, खरेदी-विक्रीच्या नोंदी,भंगार मालाचा स्रोत,वजन व व्यवहाराच्या पावत्या,साठवणुकीची पद्धत आणि सार्वजनिक जागेचा वापर यांची प्रशासनाने तपासणी केल्यास वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे.त्यामुळे केवळ पत्रकाराला दमदाटीच्या प्रकरणापुरती कारवाई न करता,संबंधित भंगार व्यवसायाच्या नियमबद्धतेचीही चौकशी करावी,अशी मागणी जोर धरत आहे.पोलिस प्रशासन आता या तक्रारीची कोणत्या पद्धतीने दखल घेते आणि भंगार व्यवसायाबाबत संबंधित विभागांकडून तपासणी केली जाते का,याकडे कुडाळसह तालुक्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी निवेदन देताना जावली सोशल मीडिया पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भास्कर धनावडे,सुनील धनावडे,युवराज धुमाळ, व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष जितिन वंदे,शेखर जाधव,बजरंग चौधरी हनुमंत धनावडे नामदेव मर्ढेकर श्रीकांत गोळे यांच्यासह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर दबाव नको

एखाद्या बातमीबाबत आक्षेप असल्यास संबंधित व्यक्तीला कायदेशीर मार्गाने स्पष्टीकरण देण्याचा अधिकार आहे.मात्र पत्रकाराला धमकावणे,दमदाटी करणे अथवा अरेरावीची भाषा वापरणे हा मार्ग योग्य नाही.बातमी चुकीची वाटत असल्यास कायदेशीर किंवा अन्य वैधानिक मार्ग उपलब्ध आहेत;परंतु पत्रकारावर दबाव आणण्याचा प्रयत्न योग्य नाही,अशी भूमिका पत्रकार संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button