Uncategorized

सातारा बोगदा परिसर हत्येने हादरला: कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा खून

सातारा शहरानजीक असलेल्या सातारा बोगदा परिसरात ३५ वर्षीय महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याचा पतीवर संशय; शाहूपुरी पोलिसांनी काही तासांत संशयिताला घेतले ताब्यात

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरानजीक असलेल्या ऐतिहासिक सातारा बोगदा परिसरात मध्यरात्री कौटुंबिक वादातून एका ३५ वर्षीय महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे सातारा बोगदा परिसरासह संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सुनिता प्रदीप चव्हाण (वय ३५, रा. सातारा बोगदा परिसर) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री याच वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले.

वादाच्या रागातून पती प्रदीप हणमंत चव्हाण याने पत्नी सुनिता चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनिता यांचा मृत्यू झाला. मध्यरात्री घडलेल्या या रक्तरंजित घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, खून केल्यानंतर घटनास्थळावरून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संशयित पती प्रदीप चव्हाण याला पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले.

या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हत्येमागे केवळ कौटुंबिक वाद कारणीभूत आहे की आणखी काही गंभीर कारण आहे, याचा तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत. तपासादरम्यान हत्येचे नेमके कारण आणि घटनेमागील संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button