Uncategorized

मेढ्यात व्होल्टेजच्या खेळखंडोबामुळे ‘CNG’ सेवा ठप्प; कौस्तुभ पेट्रोलियमवर वाहनधारकांचे हाल..

रंगतारा प्रतिनिधी:-श्रीकांत गोळे.

मेढा: महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे मेढा येथील ‘कौस्तुभ पेट्रोलियम’ या पेट्रोल पंपावर वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विजेचे व्होल्टेज सतत कमी-जास्त (लो-हाय व्होल्टेज) होत असल्यामुळे पंपामधील CNG भरण्याची यंत्रणा वारंवार बंद पडत आहे. परिणामी साठा उपलब्ध असूनही वाहनांमध्ये इंधन भरता येत नसल्याने वाहनधारकांना तासनतास ताटकळत राहावे लागत असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मेढा व आसपासच्या ग्रामीण भागात गेल्या काही काळात CNG वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. दररोज शेकडो वाहनधारक इंधनासाठी कौस्तुभ पेट्रोलियम येथे येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विजेच्या अनियमित व्होल्टेजमुळे या पंपावरील कॉम्प्रेसर आणि डिजिटल मशीन सुरळीत चालू शकत नाहीत. पंपावर CNG चा पुरेसा साठा उपलब्ध आहे; परंतु केवळ विजेच्या लपंडावामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे वाहनधारकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

लांबच लांब रांगेत उभे राहूनही वेळेवर इंधन मिळत नसल्याने नोकरदार, व्यावसायिक आणि प्रवाशांचे वेळेचे मोठे नुकसान होत आहे. वाढत्या त्रासाला कंटाळून वाहनधारकांनी महावितरण आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“CNG उपलब्ध असूनही विजेच्या समस्येमुळे इंधन मिळत नसेल, तर प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढायला हवा. सततच्या व्होल्टेज समस्येमुळे आमचा मौल्यवान वेळ वाया जात आहे. संबंधित विभागाने मेढा परिसरातील वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा.”त्रस्त वाहनधारक

संबंधित यंत्रणेने व महावितरण विभागाने या समस्येची गंभीर दखल घेऊन कौस्तुभ पेट्रोलियम परिसरातील व्होल्टेजची अडचण तात्काळ दूर करावी आणि CNG पुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी आता सर्वसामान्य वाहनधारकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button