Uncategorized

कमिशनचे आमिष दाखवून ‘म्युल अकाउंट्स’ चालवणारी टोळी उद्ध्वस्त; ४ आरोपींना अटक!

इन्वेस्टमेंट स्कीम, डिजिटल अरेस्ट अन् जॉब ऑफरद्वारे ऑनलाईन फसवणूक; २.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

कमिशनचे आमिष दाखवून ‘म्युल अकाउंट्स’ चालवणारी टोळी उद्ध्वस्त; ४ आरोपींना अटक

इन्वेस्टमेंट स्कीम, डिजिटल अरेस्ट अन् जॉब ऑफरद्वारे ऑनलाईन फसवणूक; २.३४ लाखांचा मुद्देमाल जप्

रंगतारा बातमीदार (सातारा): नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर (NCCRP) नोंद झालेल्या तक्रारींच्या आधारे, संघटीत पद्धतीने ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा सातारा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती व एटीएम कार्ड गोळा करून फसवणुकीचे पैसे हस्तांतरित (Layering) करणाऱ्या ४ अट्टल आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्याकडून २ लाख ३४ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे पथक बनावट खात्यांचा मागोवा घेत होते. दि. २० ऑगस्ट रोजी पोलीस कॉन्स्टेबल ओंकार डुबल यांना गुप्त माहिती मिळाली की, कोरेगाव येथील काही तरुण सर्वसामान्यांना १.५ ते ३% कमिशनचे आमिष दाखवून बँक खाती, एटीएम कार्ड्स व सिम कार्ड्स गोळा करत आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळी व त्यांच्या पथकाने कोरेगाव येथील तीळगंगा नदी पुलाजवळ बनावट डमी ग्राहक तयार करून सापळा रचला. एटीएम कार्ड स्वीकारण्यासाठी आलेल्या इसमाला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्याच्या अन्य ३ साथीदारांचा पर्दाफाश झाला.

३५ हून अधिक गुन्ह्यांशी संबंध निष्पन्न

तपासात आरोपींच्या ताब्यातील आयडीबीआय बँक (गणेश सप्लायर्स), बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक इत्यादी खात्यांवर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या राज्यांतील ३५ हून अधिक सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद असल्याचे समोर आले आहे. आरोपी टेलिग्राम व इंस्टाग्रामद्वारे मुख्य सूत्रधारांच्या संपर्कात होते.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल (₹ २,३४,७५०/-):

  • मोबाईल हँडसेट्स (५ नग): iPhone 15 Pro, Motorola Edge 60 Stylus, Vivo Y31, Vivo Y200, Samsung S20FE, Realme UI 13+.
  • बँक साहित्य: विविध बँकांचे ८ Debit/ATM कार्ड्स.
  • इतर: ४ जादा SIM कार्ड्स, पॅन कार्ड, ओळखपत्रे व कागदपत्रे.
  • वाहने व रोख: १ रॉयल इनफिल्ड बुलेट (MH-11-DP-4336) आणि ₹ ३३,६५०/- रोख रक्कम.

कायदेशीर कारवाई:

या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके करत आहेत.

⚠️ पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांचे आवाहन: “कोणीही पैशांच्या वा कमिशनच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे किंवा नातेवाईकांचे बँक खाते, ATM कार्ड, पासबुक किंवा SIM कार्ड अनोळखी व्यक्तींना वापरण्यासाठी देऊ नये. असे केल्यास तुम्ही नकळत आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारीचे भागीदार बनू शकता व तुमच्यावर कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते. असा प्रकार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा.”

कारवाई करणारे पथक: पो.अ. निखिल पिंगळे व अप्पर पो.अ. डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश माळी, एलएचसी सुप्रिया रोमन, एचसी संदीप पाटील, पीसी ओंकार डुबल, पीसी रणजीत कुंभार, पीसी प्रशांत मोरे, एलपीसी जुनघरे व एलपीसी पवार यांनी ही यशस्वी कामगिरी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button