Uncategorized

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठकीत सामाजिक सलोख्याचा संदेश

ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठकीत सामाजिक सलोख्याचा संदे

सातारा : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत हिंदू-मुस्लिम समाजात शांतता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी सातारा येथील अलंकार हॉलमध्ये हिंदू-मुस्लिम शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पोलीस प्रशासन, मौलाना, मस्जिद ट्रस्टी, शांतता समिती सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि पोलीस पाटील मोठ्या संख्येने सहभागी झाले.

बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निलेश तांबे यांनी मार्गदर्शन केले. ईद-ए-मिलादचा उत्सव शांततेत, उत्साहात आणि सर्व समाजांना विश्वासात घेऊन साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

बैठकीत ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांबाबत नागरिकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. OTP, बँक खात्याचा पासवर्ड, PIN अथवा अन्य गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या APK फाईल, लिंक किंवा संदेशांवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले.

गावातील कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता राखण्यासाठी पोलीस पाटलांनी निष्पक्ष व तटस्थ भूमिका बजावावी. कोणत्याही राजकीय पक्ष अथवा संघटनेची बाजू न घेता गावातील प्रत्येक घटकाशी समन्वय ठेवावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा

आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधावा. आवश्यक परवानग्या घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत उत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, आनेवाडी टोलनाक्यावर अपघात करून एका इसमाला चारचाकी वाहनामध्ये घेऊन जाण्याचा प्रकार घडला असता, नागेवाडीचे पोलीस पाटील विक्रम भोसले यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ हालचाली केल्या. नागेवाडी फाट्यावर सदर वाहन अडवून संबंधित इसमाची सुटका करण्यात आली. तसेच अपघात करून घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या वाहनचालकास पोलीसांच्या मदतीने पकडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलीस पाटील विक्रम भोसले यांनी दाखवलेले प्रसंगावधान, धाडस, कर्तव्यतत्परता आणि सामाजिक बांधिलकी याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते पोलीस पाटील विक्रम भोसले यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची शाबासकीची थाप देण्यात आली.

या बैठकीस शांतता समिती सदस्य शफीक शेख, राजेंद्र बर्गे, आयुब शमशुद्दीन मोकाशी यांच्यासह मस्जिदचे ट्रस्टी, ज्येष्ठ नागरिक आणि पोलीस पाटील उपस्थित होते. सुमारे 75 ते 95 नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचा निर्धार करण्यात आला.

ईद-ए-मिलादच्या निमित्ताने धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि कर्तव्यनिष्ठेचा संदेश देणारी ही बैठक ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button