अपघातातील जखमी गाईसाठी तळमळला जीव; रेस्क्यूसाठी धावली माणुसकी.
गोमातेची हेळसांड करणाऱ्या कुटुंबियांवर कारवाईची मागणी

महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर मेटगेताड गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी होऊन रस्त्यावर तडफडणाऱ्या गाईसाठी माणुसकी धावून आल्याचे बघायला मिळाले. अपघातात जखमी झालेल्या गाईला जीवदान देण्यासाठी अनेकांचा जीव तळमळताना बघायला मिळाला.
अपघातात जखमी झाल्यामुळे होणाऱ्या असह्य वेदना आणि वरून पडणारा मुसळधार पाऊस यामुळे होणारे गाईच्या जीवाची तडफड बघून गाईला रेस्क्यू करण्यासाठी उपस्थित प्रवाशांनी धडपड चालू केली. जवळपास एक तासानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने उपस्थित प्रवाशांनी गाईला उपचारासाठी वाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्याच्या हालचाली चालू केल्यानंतर ज्यांच्या मालकीची ही गाय होती ते आखाडे दाम्पत्य घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी उपस्थित प्रवासी व ग्रामस्थांनी गाईला मोकळे सोडल्याचा जाब विचारल्यानंतर या दांपत्याकडून उपस्थितांनाच अरेरावीची भाषा वापरण्यात आली. यामुळे गाईला मोकाट सोडून तिच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आखाडे दांपत्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता उपस्थितांमधून होत आहे.



