सातारा डेपो मॅनेजरच्या ‘हम करे सो कायदा’ कारभाराविरोधात युवा राज्य फाउंडेशन आक्रमक; निलंबनाची आणि आंदोलनाची मागणी!
एसटी महामंडळाच्या हिताला बाधा आणणाऱ्या अशा अधिकार्यावर शिस्तभंग आणि तात्काळ निलंबनाची कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे," अशी आग्रही मागणी युवा राज्य फाउंडेशनने केली आहे. येत्या १५ दिवसांत प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर विभाग नियंत्रकांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल

सातारा एसटी आगारात डेपो मॅनेजरचा ‘हम करे सो कायदा’ कारभार! महारुद्र तिकुंडे यांचा प्रशासनाला थेट इशारा, १५ दिवसांत निलंबन न झाल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सातारा आगारात सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, येथील डेपो मॅनेजर रत्नाकर मानसिंग शिंदे यांच्या मनमानी आणि बेशिस्त कारभाराचे वाभाडे काढण्यात आले आहेत. “शिंदे यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे आगारात प्रचंड बेशिस्त वाढली असून, वरिष्ठ व ज्येष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे,” असा घणाघाती आरोप युवा राज्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केला आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यावर १५ दिवसांत निलंबनाची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली! मिळालेल्या माहितीनुसार, सातारा विभाग नियंत्रकांच्या स्पष्ट आदेशांची पायमल्ली करत डेपो मॅनेजर रत्नाकर शिंदे हे ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने कारभार हाकत आहेत. वरिष्ठ कार्यालयाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही, श्रीमती गवळी नामक कर्मचाऱ्याला त्याच ठिकाणी नियमबाह्य नियुक्ती देण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशाचे उघड उल्लंघन करून प्रशासकीय शिस्तीला सुरुंग लावण्याचे काम थेट डेपो मॅनेजरकडूनच होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महामंडळाची प्रतिमा मलिन करण्याचा डाव?
महारुद्र तिकुंडे यांनी दिलेल्या पत्रात गंभीर आरोप करण्यात आले आहेत की, डेपो मॅनेजर शिंदे आणि श्रीमती गवळी हे संगनमताने इतर प्रामाणिक कर्मचारी व अधिकाऱ्यांची प्रसारमाध्यमांद्वारे नाहक बदनामी करत आहेत. अंतर्गत राजकारणासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी महामंडळासारख्या सार्वजनिक संस्थेची नाहक बदनामी केली जात असून, यामुळे एसटी प्रशासनाची जनमानसातील प्रतिमा डागाळत आहे.
आर्थिक लाभाचे आणि छळाचे गंभीर आरोप!
तिकुंडे यांनी डेपो मॅनेजर यांच्यावर अनेक गंभीर ठपके ठेवले आहेत:
वरिष्ठांच्या आदेशांची अवमानना:वरिष्ठ कार्यालयाचे प्रशासकीय आदेश जाणीवपूर्वक धुडकावणे.
आर्थिक हितसंबंध:वैयक्तिक आर्थिक लाभासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवून देणे.
कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण:प्रामाणिक आणि ज्येष्ठ कर्मचाऱ्यांवर दबाव आणून त्यांचे मनोबल खच्ची करणे.
तर दालनासमोर ठिय्या आंदोलन!
“एसटी महामंडळाच्या हिताला बाधा आणणाऱ्या अशा अधिकार्यावर शिस्तभंग आणि तात्काळ निलंबनाची कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे,” अशी आग्रही मागणी युवा राज्य फाउंडेशनने केली आहे. येत्या १५ दिवसांत प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर विभाग नियंत्रकांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनादरम्यान होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या बिघाडाला सर्वस्वी ‘एसटी प्रशासन’ जबाबदार राहील, असा सणसणीत इशारा महारुद्र तिकुंडे यांनी दिला आहे.आता या गंभीर आरोपांनंतर एसटीचे वरिष्ठ प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



