लाचखोर पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात १.२५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले.
लाचखोर पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात १.२५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले.

गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी आणि गोदाऊनची वारंवार तपासणी टाळण्यासाठी सव्वा लाखाची लाच स्वीकारणाऱ्या कोरेगाव येथील पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यासह एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
आरोपींची नावे:
१. आनंद कैलास शिंदे (वय- पुरवठा निरीक्षण अधिकारी, तहसिल कार्यालय, कोरेगाव, वर्ग-२).
२. अवधुत दिलीप कालेकर (वय ३६ वर्षे, खाजगी इसम, रा. कोरेगाव).
नेमकी घटना काय?
तक्रारदार यांची कोरेगाव येथे ‘भारत गॅस एजन्सी’ आहे. सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस वितरण नियमानुसार सुरू असताना, पुरवठा निरीक्षक आनंद शिंदे यांनी एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी आणि गोदाऊनची वारंवार तपासणी न करण्यासाठी २,००,००० रुपयांची मागणी केली होती.
यापूर्वी घाबरलेल्या तक्रारदाराने ३१ मार्च २०२६ रोजी २५,००० रुपये दिले होते. मात्र, उरलेल्या रकमेसाठी शिंदे यांनी तगादा लावल्याने तक्रारदाराने १ एप्रिल रोजी सातारा एसीबीकडे तक्रार नोंदवली.
असा रचला सापळा
एसीबीने १ एप्रिल रोजी पडताळणी केली असता, तडजोडीनंतर १,२५,००० रुपये घेण्याचे ठरले. त्यानुसार आज, ६ एप्रिल २०२६ रोजी कोरेगाव येथील ‘जनसेवा सहकारी बँक’ परिसरामध्ये सापळा रचण्यात आला. शिंदे यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम अवधुत कालेकर याने सव्वा लाखांची लाच स्वीकारली आणि दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.
तपास पथक
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले आणि पोलीस उप-अधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सुप्रिया गावडे आणि त्यांच्या पथकाने हा यशस्वी सापळा रचला.
सध्या दोन्ही आरोपींविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आवाहन: कोणत्याही शासकीय कामासाठी कोणाही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्वरित एसीबीच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा ७०५७५७१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा.



