Uncategorized

कामेश कांबळेला योग्य वेळी सन्मानपूर्वक संधी देणार; समर्थक, सहकाऱ्यांनी काळजी करू नये :

कामेश कांबळेला योग्य वेळी सन्मानपूर्वक संधी देणार; समर्थक, सहकाऱ्यांनी काळजी करू नये : कामेश हा कालही माझ्या विचारांचा होता आणि आजही माझ्याच विचारांचा : मंत्री शिवेंद्रराजे भोसले

कांबळे हा वयाने लहान असला तरी तो मूळचा भाऊसाहेब महाराजांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या पश्चात तो माझ्यासोबत समाजकारणात सक्रिय राहिला आहे. माझ्या कार्यकर्त्याला हरप्रकारे ताकद देण्याचे काम मी नेहमीच केले असून काहीही झाले तरी मी माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देत नाही. राजकारणात काही वेळेला पेच निर्माण होतो त्यावेळी काही निर्णय मागे घ्यावे लागतात. कामेशला यावेळी जिल्हा परिषद सभापती पदावर पोहचवता आले नाही, मात्र कामेशला योग्य वेळी सन्मानपूर्वक योग्य संधी दिली जाईल, असा शब्द एक आमदार म्हणून देत आहे, त्यामुळे कामेशचे समर्थक, सहकारी, कार्यकर्ते यांनी नाराज, हवालदिल होऊ नये, कसलीही काळजी करू नये,असे आवाहन ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे की, स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन कामेश कांबळे याने तरुण वयात समाजकारण चालू केले. भाऊसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना त्याने चांगली तरुण फळी उभी करून चांगल्या विचाराने काम केले. युवा पिढीच्या माध्यमातून त्याने समाजकारण करताना जनहित जपण्याचे काम केलं आहे. नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत त्याने भाजपकडून उमेदवारी मागितली होती. त्याला उमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्न केले होते. तथापि काही अडचणीमुळे त्याला भाजपची उमेदवारी मिळाली नाही. समाजकारण चालू राहावे यासाठी त्याने राष्ट्रवादी पक्षातून निवडणूक लढवली. कामेश हा कालही माझ्या विचारांचा होता आणि आजही माझ्याच विचारांचा आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी त्याने जी भूमिका बजावली आहे याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. याशिवाय संपूर्ण जिल्ह्याने, भारतीय जनता पार्टी आणि पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनीही याची दखल घेतली आहे.

जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीमध्ये सुद्धा कामेशला योग्य संधी मिळावी असे निर्णय झाले होते. वरिष्ठांनी काही निर्णय दिले होते. निवडणूक किंवा राजकारणात काही वेळेला समोर पेच निर्माण झाला असेल त्यावेळी काही निर्णय मागे घ्यावे लागतात. यावेळी कामेशला सभापती पदावर पोहचवता आले नाही पण, त्याच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, एक आमदार, लोकप्रतिनिधी आणि मंत्री म्हणून मी कामेश, त्याचे सर्व सहकारी, सर्व समर्थक आणि सर्व कार्यकर्त्यांच्या कायम पाठीशी उभा आहे. माझ्या कार्यकर्त्यावर मी कधीच अन्याय होऊ देत नाही. कामेशला ताकद देणे ही माझी भूमिका आहे. यावेळी नाही जमलं पण, योग्य वेळी योग्य संधी देऊन कामेशचा सन्मान निश्चितच करू, असा शब्द मी कामेश, त्याचे सर्व सहकारी, समर्थक आणि कार्यकर्त्यांना देत आहे. त्यामुळे कोणीही नाराज, हवालदिल होऊ नये, कामेशच्या बाबतीत कसलीही काळजी करू नये, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button