रुग्णालयातील ‘त्या’ प्रकरणाचा दणका; मृतदेह अदलाबदल प्रकरणी दोन जणांचे तात्काळ निलंबन.
सातारा जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची पुन्हा अदलाबदलः नातेवाईकांचा व्यवस्थापनाबद्दल संताप, शवचिकित्सा गृहासमोरच धरणे आंदोलन.

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देताना त्याची पुन्हा अदलाबदली झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची दखल जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेत याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, सोनगरवाडी (ता. वाई) येथील आनंद ओव्हाळ (वय २६) यांनी विषप्राशन केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर आरळे येथील सुरेश मस्कु खोमणे (वय ५१) हे मागील तीन दिवसांपासून उपचार घेत होते. उपचारादरम्यान रात्री त्यांचे निधन झाले.
दोन्ही मृतदेहांचे रात्रीच शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, सकाळी नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात देण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. मृतदेह ताब्यात दिल्यानंतर आरळे येथील नातेवाईकांनी खोमणे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.
पेटवलेली चिता विझविण्यात आली.
दरम्यान, ही अदलाबदल झाल्याचे लक्षात येताच अंत्यसंस्कारासाठी पेटवलेली चिता विझवण्यात आली. या घटनेमुळे नातेवाईक आक्रमक झाले असून, रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याच्या (स्वीपर) हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नातेवाईकांचा संताप आणि कर्मचाऱ्यांची खडाजंगी.
सोनगीर वाडी येथील मयत योगाच्या नातेवाईकांनी संबंधित प्रकाराबाबत संताप व्यक्त करत रुग्णालय व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घातला. मृतदेहाचे तोंड दाखवण्यात न आल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा संताप व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यांना ताबडतोब आमच्या समोर आणा अशी मागणी केली.
दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस.
हा गंभीर प्रकार समोर येतात सातारा पोलीसही घटनास्थळी उपस्थित झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे यांनी या प्रकरणांमध्ये दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मृतदेहांचा चेहरा नातेवाईकांना दाखवून खात्री करण्यात आल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. मग नक्की चूक झाली कुठे हे शोधण्यामध्ये आता प्रशासन व्यस्त झाले आहे.



